नवी दिल्ली : गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी काल मतदान झाले. भाजपकडून अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बलवंतसिंह राजपूत हे उमेदवार होते. तर काँग्रेस नेते अहमद पटेल हे निवडणूक रिंगणात होते. पटेल यांना पाडण्यासाठी अमित शाह यांनी फिल्डींग लावली होती. मात्र, त्यात ते अपयश ठरले. दरम्यान, क्रॉस मतदान झाल्यानंतर राजकीय नाट्य पाहायला मिळाला. त्यामुळे मध्यरात्री निकाल जाहीर करावा लागला.
काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपला मतदान केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. ही दोन मत बाद करण्यासाठी काँग्रेस आक्रमक झाला. दरम्यान, भाजपच्या आमदारांने काँग्रेसला क्रॉस मतदान केल्याने भाजपही आक्रमक झाले. त्यामुळे निकाल लागण्यास उशीर झाला.
सायंकाळी ६.३० वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार होता. रात्री ८ पर्यंत निकाल जाहीर झाला असता; परंतु काँग्रेस बंडखोर नेते शंकरसिंग वाघेला यांच्या गटात सामील झालेल्या दोन आमदारांनी आपली मते भाजप अध्यक्ष अमित शाह यांना दाखवून मतपेटीत टाकल्याचा दावा काँग्रेसने केला. मतमोजणीपूर्वी या आमदारांची मते बाद ठरविण्याची मागणी काँग्रेसने केली. सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० पर्यंत तीन तासांत काँग्रेस आणि भाजपच्या शिष्टमंडळांनी तब्बल तीनवेळा निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. अखेर व्हिडीओचा पुरावा पाहून क्रॉस व्होटिंग झाल्याचे ग्राह्य धरले आणि या दोन आमदारांची मते बाद केली.
रात्री बारानंतर गुजरात विधान भवनात मतमोजणीला सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर आणखी नाट्य रंगले. भाजपचे आमदार नलीनभाई कोठाडिया यांनी आपण काँग्रेसचे अहमद पटेल यांना मत दिल्याचे जाहीर केले. पटेल-पाटीदार आंदोलनात १४ जणांचा मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण काँग्रेसला मत दिल्याचे ते म्हणाले. भाजपने यावर आक्षेप घेत नलीनभाई यांचे मत बाद करावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आणि मतदान रोखले. मध्यरात्री दीडपर्यंत हा तिढा कायम होता.
गुजरात विधानसभेतील सर्व १७६ आमदारांनी मतदान केले. त्यांत भाजपचे १२१ आमदार आहेत. उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४५ मतांची गरज आहे. भाजपकडून अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी हे सहज विजयी होतील. फक्त तिसरे उमेदवार बलवंतसिंह राजपूत यांना विजयासाठी १४ मतांची गरज आहे. विधानसभेत काँग्रेसचे ५० आमदार आहेत. त्यांतील सात आमदार शंकरसिंग वाघेला यांच्या गटात सामील झाल्यामुळे काँग्रेसचे ४४ आमदार राहतात. या सर्व आमदारांनी अहमद पटेलांना मत दिल्याचा काँग्रेसचा दावा आहे. राष्ट्रवादीचे एक मत आणि जदयूचे एक मत पटेल यांना मिळाले. त्यामुळे ४५ मतांचा कोटा पटेल यांनी पूर्ण केल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
नक्की काय घडले?
काँग्रेसचे बंडखोर नेते शंकरसिंग वाघेला यांच्या गटात सामील झालेल्या सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग करीत भाजपला मतदान केले. यांतील आमदार भोलाभाई मोहील आणि राघवजीभाई पटेल या दोन काँग्रेस आमदारांनी आपले मत भाजप अध्यक्ष अमित शाह यांना दाखविले, असा काँग्रेसचा आरोप आहे.
राज्यसभा निवडणुकीत आमदारांना पक्षाकडून व्हीप बजाविण्यात येतो. आमदाराने आपले मत पक्षाच्या पोलिंग एजंटला दाखवून मतपेटीत टाकायचे असते. मात्र, राघवजीभाई पटेल आणि भोलाभाई मोहील यांनी आपले मत भाजप अध्यक्ष अमित शाह यांना दाखविले. याचा पुरावा म्हणून व्हिडिओ असल्याचा काँग्रेसचा दावा केलाय.
मतमोजणी सुरू होण्यापूर्वी काँग्रेसने गुजरात निवडणूक आयोगाकडे या दोन आमदारांची मते बाद करण्याची मागणी केली. मात्र, ही मागणी फेटाळण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता नवी दिल्लीत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि आर. पी. सिंह यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आणि आयोगाच्या नियमावलीतील १९६१ मधील नियम ३९चे उल्लंघन असल्याचे काँग्रेसचे म्हटले.
त्यानंतर सायंकाळी ७.१५ वाजता भाजपच्यावतीने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, विधी व न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद, वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन, ऊर्जामंत्री पीयूष गोयल, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार ज्योती यांची भेट घेऊन काँग्रेसचा दावा फेटाळून लावण्याची मागणी केली.
रात्री ७.५० वाजता पाच केंद्रीय मंत्री निवडणूक आयुक्तांना भेटल्यानंतर पुन्हा काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, पी. चिदंबरम आणि सुरजेवाला यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यावेळी राजस्थानचे एक उदाहरण देण्यात आले. त्यानंतर पुन्हा रात्री ८ वाजता भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर रात्री ९.१५ वाजता काँग्रेसचे शिष्टमंडळ भेटले. रात्री९.२५ वाजता भाजप शिष्टमंडळ परत भेटीला गेले. तीन तासांत काँग्रेस आणि भाजपचे शिष्टमंडळ तब्बल तीन वेळा आयुक्तांना भेटले.