अहमदाबाद : गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील नाएका आणि भेराई भागातील मुलांना शाळेत जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतोय... याचं कारण म्हणजे या दोन गावांना जोडणारा पूल... नाएका आणि भेराई गावांना जोडणारा पूल गेल्या दोन महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. यामुळेच पुलाला टेकू देणाऱ्या पिलर्सवर थरारकरित्या चढून आपला जीव धोक्यात घालत शाळेत जाण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आलीय.
या पिलर्सवर चढता येत नसेल तर या विद्यार्थ्यांना १० किलोमीटर अंतर पार करून मग शाळेत पोहचावं लागणार आहे... जे या सामान्य मुलांना परवडणारं नाही. त्यामुळे, या गावांतील रहिवासी आणि लहान विद्यार्थीही याच नाल्यावरून एकमेकांना मदत करत हा पूल पार करत आहेत.
#WATCH: School children crossing a bridge between Naika & Bherai village of Kheda district. The bridge broke down 2 months ago. #Gujarat pic.twitter.com/7ToM5W783I
— ANI (@ANI) July 11, 2018
न्यूज एजन्सी एएनआयनं या थरारक दृश्यांचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या नाल्याची उंची जवळपास ९ फूट असल्याचं सांगण्यात येतंय. व्हिडिओमध्ये तीन लोक एकेका विद्यार्थ्याला हा पूल पार करण्यासाठी मदत करताना दिसत आहेत. एकाकडूनही चूक झाली तर ती या लहानग्यांच्या जीवावर बेतू शकते, हे या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून येतंय.
याबद्दल अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी पावसाचं कारण देत काम सुरू होत नसल्याचं सांगून हात वर केलेत.