पगार मागितला म्हणून महिला व्यावसायिकाने तोंडात धरायला लावली चप्पल; गुजरातमधील प्रकार, गच्चीवर नेऊन...

Gujarat Crime : 

आकाश नेटके | Updated: Nov 24, 2023, 02:27 PM IST
पगार मागितला म्हणून महिला व्यावसायिकाने तोंडात धरायला लावली चप्पल; गुजरातमधील प्रकार, गच्चीवर नेऊन... title=

Gujarat Crime : गुजरातच्या मोरबीमधून एक किळसवाणी घटना समोर आली आहे. मोरबीमध्ये कामाचा पगार मागणाऱ्या एका व्यक्तीला तोंडात जोडे घालून माफी मागण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला व्यावसायिकाने तिच्या कर्मचाऱ्यासोबत हा क्रूर प्रकार केला आहे. पगार मागण्यासाठी कर्मचारी महिलेकडे गेला होता. त्यावेळी महिला व्यावसायिकाने जबरदस्तीने चप्पल कर्मचाऱ्याच्या तोंडात घातली आणि चप्पल तोंडात ठेवून माफी मागण्यास सांगितले. कर्मचाऱ्याने महिलेकडे थकीत पगार मागितला होता. मात्र तिने आणि अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली.

गुजरातच्या मोरबी शहरात एका व्यावसायिक महिलेसह तिच्या कर्मचार्‍यांवर गुरुवारी एका दलित तरुणाला तिच्या फर्ममधील माजी कर्मचाऱ्याला तोंडात चप्पल ठेवून माफी मागण्यास भाग पाडल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबत महिला व्यावसायिकाने माजी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचेही समोर आलं आहे. मोरबी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, विभूती पटेल उर्फ ​​राणीबा असे आरोपी व्यावसायिकाचे नाव आहे. मारहाण झालेल्या माजी कर्मचाऱ्याने विभूती पटेल आणि काही लोकांविरोधात मोरबी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कर्मचाऱ्याच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी विभूती पटेल आणि इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार कर्मचारी राणीबा इंडस्ट्रीजच्या निर्यात विभागात मार्केटिंगचे काम करत होता. तो त्याचा मोठा आणि शेजाऱ्यासह राणीबा इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये 16 दिवसांचा पगार मागण्यासाठी गेला होता. कंपनीकडे त्याने ऑक्टोबरमध्ये केलेल्या कामाचा पगार मागितला. यावर विभूतीचा भाऊ आहे असे सांगणाऱ्या ओम पटेल याने तक्रारदाराला मारहाण केली. ऑफिस मॅनेजर परीक्षित पटेल यानेही तक्रारदाराला मारहाण केली. त्यांनी कर्मचाऱ्याला लिफ्टमधून छतावर ओढत नेले आणि तिथे बेल्टने मारहाण केली. त्यानंतर विभूतीने जबरदस्तीने चप्पल तोंडात घातली आणि माफी मागण्यास सांगितले, असे तक्रारदाराने तक्रारीत म्हटलं आहे.

विभूतीने मला धमकावले की, जर मी तक्रार देण्याचे धाडस केले तर मला ठार मारले जाईल, असेही कर्मचाऱ्याने म्हटलं. याप्रकरणी मोरबीचे पोलीस उपअधीक्षक प्रतिपालसिंग झाला यांनी मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. 'त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही एफआयआर नोंदवला असून आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,' असे पोलीस उपअधीक्षक प्रतिपालसिंग यांनी सांगितले.