वडोदरा : झोपडपट्ट्यांवर कारवाई केल्याने चिडलेल्या नागरिकांनी भाजपच्या स्थानिक नगरसेवकाला झाडाला बांधून मारहाण केली. मारहाण करण्यापूर्वी नागरीकांनी या नेत्याला झाडापर्यंत फरफटत आणले.
हसमुख पटेल असे या नगरसेवकाचे नाव असून, ते भाजपचे स्थानिक नेते आहेत. हसमुख यांना मारहाण करत असताना लोकांनी मोबाईलद्वाचे त्याचे चित्रीकरणही केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांनी केलेल्या मारहाणीत हसमुख यांच्या अंगावरील कपडेही फाटले. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तब्बल ७० जणांना ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक नागरिकांनीच हसमुख यांच्यावर हल्ला करत मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता पालिकेने आमच्या झोपड्यांवर कारवाई केल्यामुळे नागरिकांनी हे पाऊल उचलले असा स्थानिकांचा आरोप आहे. कारवाई करण्यापूर्वी आपल्याला कल्पना का देण्यात आली नाही, अशी विचारणा करण्यासाठी स्थानिकांनी पालिका कार्यालय गाठले. त्यावेळी आपण त्याबाबतची कल्पना स्थानिक नगरसेवक हसमुख पटेल यांच्याकडे नोटीस पाठवली असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर लोकांचा संताप अनावर झाला.
हसमुख यांना झाडाला बांधून मारहाण करताना नागरिक नोटीस मिळूनही तुम्ही आम्हाला कल्पना का दिली नाही, असे विचारताना व्हिडिओत दिसतात. यावर आपल्याला याची काहीच कल्पना नसल्याचे हसमुख वारंवार सांगतानाही दिसतात.