व्हिडिओ :... आणि त्यानं भरसभेत हार्दिक पटेलच्या श्रीमुखात लगावली

सौराष्ट्रमधील जनसंघर्ष आक्रोश सभा सुरु असताना हा सगळा प्रकार घडला

Updated: Apr 19, 2019, 01:53 PM IST
व्हिडिओ :... आणि त्यानं भरसभेत हार्दिक पटेलच्या श्रीमुखात लगावली title=

अहमदाबाद : आत्तापर्यंत पाटीदार समाजाचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परंतु, काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये सहभागी झालेल्या हार्दिक पटेल यांच्या भरसभेत एका व्यक्तीनं श्रीमुखात लगावल्याची घटना घडलीय. 

गुजरातच्या सुरेंद्रनगर भागात ही घटना घडलीय. एका रॅलीत सहभागी झालेल्या जनसमुदायाला संबोधित करत असताना एक व्यक्ती अचानक मंचावर आला आणि त्यानं सर्वांदेखत हार्दिक पटेलच्या कानाखाली मारली. अचानक झालेल्या हल्ल्यानं गोंधळलेले पटेल बाजूला झाले. मंचावरच्या लोकांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत त्याची हार्दिक समर्थकांपासून सुटका केली. मारहाण करण्यात आलेल्या या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची परिस्थिती गंभीर आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहे. 
 
भर सभेत अचानक घडलेल्या या घटनेनं कार्यकर्त्यांत मोठा गोंधळ उडाला. सौराष्ट्रमधील जनसंघर्ष आक्रोश सभा सुरु असताना हा सगळा प्रकार घडला. 

हार्दिक पटेल यांना जामनगरमधून लोकसभा निवडणूक २०१९ च्या रणसंग्रामात उतरण्याची इच्छा होती. परंतु, कोर्टात प्रलंबित असलेल्या एका खटल्यामुळे ते आपला उमेदवारी अर्ज वेळेत दाखल करू शकले नाहीत. 

गुजरात उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी २ एप्रिल सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा गाठला होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयानं हार्दिक पटेल यांच्या अर्जावर तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. 

पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना दंगल भडकावण्या प्रकरणी गुजरात हायकोर्टानं दोषी ठरवलं होतं. हार्दिक पटेल यांना ऑगस्ट २०१८ मध्ये शिक्षा सुनावण्यात आली होती त्यामुळे मग आत्ताच अशी काय वेळ आली? असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या अर्जावर तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला होता.