सरकारसाठी आनंदाची बातमी; 6 वर्षांचा रेकॉर्ड मोडत 1.87 लाख कोटींचा GST जमा

GST Collection : एप्रिल 2023 मधील जीएसटी संकलनाच्या आकडेवारीने इतिहास रचला आहे. जीएसटी संकलनाचे आकडे समोर आले असून, त्यानुसार एप्रिलमध्ये जीएसटी संकलन 1.87 लाख कोटी रुपये झाले आहे, जो आतापर्यंतचा ऐतिहासिक विक्रम आहे.

आकाश नेटके | Updated: May 1, 2023, 07:31 PM IST
सरकारसाठी आनंदाची बातमी; 6 वर्षांचा रेकॉर्ड मोडत 1.87 लाख कोटींचा GST जमा title=

GST Collection : नव्या आर्थिक वर्षात मोदी सरकारसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यातील जीएसटी (GST) संकलनाने मागील सर्व विक्रम मोडले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये जीएसटीचे संकलन 1.87 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाल्याची माहिती समोर आले आहे. गेल्या सहा वर्षांपासून जमा झालेल्या रकमेपेक्षा एप्रिल महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक मासिक संकलन झाले आहे. यामध्ये 38,440 कोटी सीजीएसटी (CGST), 47,412 कोटी एसजीएसटी (SGST) अन् 89,158 कोटी आयजीएसटी (IGST)चा समावेश आहे. 

वस्तू आणि सेवा कर 1 जुलै 2017 रोजी देशात पहिल्यांदा लागू करण्यात आला होता. गेल्या सहा वर्षांत पहिल्यांदाच एप्रिल-2023 मध्ये विक्रमी जीएसटी संकलन झाले आहे. एप्रिलमध्ये जीएसटीमध्ये 1.87 लाख कोटी रुपयांचे संकलन झाले होते. यापूर्वी, एप्रिल 2022 मध्ये सर्वाधिक म्हणजे 1.68 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. एप्रिल 2022 च्या तुलनेत गेल्या महिन्यात 19,495 कोटी रुपयांचे जीएसटीचे संकलन जास्त होते.

जीएसटी संकलनाची माहिती देताना, वित्त मंत्रालयाने सांगितले की एप्रिल 2023 मध्ये जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत 12 टक्के जास्त आहे. 20 एप्रिल 2023 रोजी एका दिवसात 9.8 लाख व्यवहार झाले, ज्यामध्ये एका दिवसात 68,228 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. यापूर्वी, एका दिवसात व्यवहाराचा विक्रम गेल्या वर्षी 20 एप्रिल 2022 रोजी होता. तेव्हा एका दिवसात 9.6 लाख व्यवहार झाले होते, ज्यामध्ये 57,846 कोटी रुपयांच्या जीएसटीची वसुली झाली होती.

गेल्या आर्थिक वर्षात 2022-23 साठी एकूण एकूण संकलन 18.10 लाख कोटी रुपये झाले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मधील एकूण संकलन मागील वर्षाच्या तुलनेत 22 टक्के जास्त आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या तिमाहीत सरासरी मासिक सकल जीएसटी संकलन 1.55 लाख कोटी रुपये आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत सरासरी मासिक संकलन अनुक्रमे 1.51 लाख कोटी रुपये, 1.46 लाख कोटी रुपये आणि 1.49 लाख कोटी रुपये होते.