India Corona Case: देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. महाराष्ट्राबरोबरच देशातील रुग्णसंख्या दिवसोंदिवस वाढत असून कोरोना मरण पावणाऱ्यांची संख्याही चिंतेचा विषय ठरत आहे. आज म्हणजेच 7 एप्रिल रोजी राज्यात कोरोनाचे नव्या 926 रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गामुळे 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत सरकारी स्तरावर बैठकींची सत्रं सुरु झाली आङेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी राज्यातील आरोग्य मंत्र्यांबरोबर आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एक बैठक घेतली. या आढावा बैठकीमध्ये सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी कोरोना परिस्थितीवर 2 तास चर्चा केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यांची सज्ज रहावं अशा सूचना याच बैठकीमध्ये केंद्राने राज्यांना दिल्या आहेत. घाबरुन जाण्याचं कारण नाही मात्र सावध राहणं गरजेचं असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
देशभरातील सर्वच राज्यांमध्ये होत असलेल्या मॉक ड्रिलसंदर्भात राज्यांनी राज्य स्तरीय आढावा बैठकी घ्याव्यात 8 आणि 9 तारखेला घ्याव्यात असे केंद्रानं सांगितलं आहे. तसेच ट्रॅक, ट्रेस आणि ट्रीट या टी-3 धोरणाबरोबरच, लसीकरण आणि कोरोना गाईड लाइन्सचं पालन होईल यासंदर्भातील पूर्ण काळजी घेतली जावी असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे केंद्राने चाचण्या वाढवण्याची आणि जीनोम सिक्वेन्सिंगचं प्रमाण वाढवण्यास सांगितलं आहे. कोरोना हॉटस्पॉट कोणते आहेत याबद्दलची माहिती गोळा करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त मॉनेटरिंग करण्यास राज्यांनी प्राधान्य द्यावं असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्व राज्यांना कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत रुग्णालयांमध्ये योग्य ती तयारी पूर्ण झालेली असेल याची खबरदारी घ्यावी असं म्हटलं आङे. केंद्राने सरकारने यावेळेस राज्यांना एक आश्वासनही दिलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा केंद्राकडून पुरवल्या जातील असं सरकारने राज्यांना सांगितलं आहे. आपल्याला सावध राहायचं आहे. मात्र उगाच लोकांमध्ये भिती पसरवायची नाही, असंही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Chaired a meeting to review COVID-19 situation with the Health Ministers of the States & Union Territories. Stressed on increasing covid testing & genome sequencing along with following COVID appropriate behaviour.
We have to be alert & avoid spreading any unnecessary fear. https://t.co/VdHazObxTS
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) April 7, 2023
मांडविया यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे की, आपआपल्या राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेऊन आरोग्य सुविधा आणि मूलभूत सेवांसंदर्भातील आढावा बैठकी घ्याव्यात. 10 आणि 11 एप्रिल रोजी संपूर्ण देशात कोरोना मॉक ड्रील होणार असून आरोग्यमंत्रीही या दिवशी अनेक रुग्णालयांना भेट देणार आहेत.