मोदी सरकार भारतीय लष्कराच्या पराक्रमामागे स्वत:चे अपयश लपवतेय- मनमोहन सिंग

आमच्या काळात सहावेळा सर्जिकल स्ट्राईक झाला.

Updated: May 2, 2019, 07:43 PM IST
मोदी सरकार भारतीय लष्कराच्या पराक्रमामागे स्वत:चे अपयश लपवतेय- मनमोहन सिंग title=

नवी दिल्ली: मोदी सरकार भारतीय लष्कराच्या पराक्रमामागे स्वत:चे अपयश दडवून पाहत असल्याचा आरोप देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखीतमध्ये त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, मी पंतप्रधान असतानाही भारतीय लष्कराने अनेक सर्जिकल स्ट्राईक केले होते. मात्र, आम्ही मते मिळवण्यासाठी त्याचा फायदा करून घेतला नाही. परंतु, आताचे मोदी सरकार आर्थिक आघाडीवरील अक्षम्य चूक झाकण्यासाठी भारतीय लष्कराच्या पराक्रमामागे लपत आहे. हे खूपच लाजिरवाणे आणि स्वीकारार्ह नसल्याचे मनमोहन सिंग यांनी सांगितले. 

मुंबईवरील २६\११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने काहीच केले नाही, या अमित शहा यांच्या आरोपालाही मनमोहन सिंग यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, मुंबईवरील हल्ल्यानंतर यूपीए सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कुटनीतीचा वापर करून पाकिस्तानमधील दहशतवाद जगासमोर आणला. त्यामुळेच २६\११ च्या हल्ल्यानंतर १४ दिवसांच्या आत लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले. तसेच यूपीए सरकारने हाफिज सईदवर १ कोटी डॉलर्सचे इनामही जाहीर केल्याचे सिंग यांनी म्हटले. 

याशिवाय, २६\११ च्या हल्ल्यानंतर आमच्या सरकारने सागरी सुरक्षा मजबूत केली आणि राष्ट्रीय दहशतवादी विरोधी केंद्राची (एनसीटीसी) संकल्पना मांडली. पण गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यास विरोध केला होता, असेही मनमोहन सिंग यांनी सांगितले.

दुसरीकडे काँग्रेसकडूनही आमच्या काळात सहावेळा सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा दावा करण्यात आला. काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, यूपीएच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राईक झाले. मात्र, आम्ही त्याचे कधीही राजकारण केले नाही, असे शुक्ला यांनी सांगितले.