नवी दिल्ली: जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. हा निर्णय भारताच्या कुटनीतीचा मोठा विजय असल्याचे मानले जाते. मात्र, 'एमआयएम'चे सर्वेसर्वा असुदुद्दीन ओवैसी यांनी मात्र याविषयी शंका उपस्थित केली आहे.
मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करू नये, यासाठी भारताने चीनशी कोणती तडजोड केली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मसूद अजहर दहशतवादी घोषित झाल्याने भारताला काय मिळणार? २००८ साली हाफिज सईदला काळ्या यादीत टाकण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही हाफिज सईद पाकिस्तानात जाहीर सभा घेत नाही का? त्याच्या राजकीय पक्षाने निवडणूक लढवली नाही का? त्यामुळे मसूद अजहरला काळ्या यादीत टाकण्यात आले असले तरी त्याने फारसा फायदा होणार नाही. हे मोठे यश असल्याचा गवगवा गेला जात असला तरी प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही, असे ओवैसी यांनी म्हटले.
A Owaisi:China se aapne kya compromise kiya?2008 mein Hafiz Saeed ko blacklist kiya gaya, kya vo public meeting nahi karta? Kya uski party election nahi ladi? Yakeenan blacklist hua hai magar isko agar aap claim kar rahe hain bhot badi kamyabi hai, ye kamyabi nahi hai abhi. pic.twitter.com/7XtQekkvk4
— ANI (@ANI) May 2, 2019
ओवेसी यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेत्यांकडून मसूद अजहर जागतिक दहशतवादी घोषित होणे, हे मोदी सरकारच्या कुटनीतीचे यश असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून भारताकडून यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. मात्र, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने गती आली होती. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मसूद अजहरच्या दहशतवादी कृत्यांविरोधात वातावरणनिर्मिती करून सुरक्षा परिषदेतील देशांना या प्रस्तावासाठी राजी केले. त्यामुळे एरवी मसूद अजहरला कायम पाठिशी घालणाऱ्या चीनलाही आंतरराष्ट्रीय दबावापुढे माघार घ्यावी लागली.