नवी दिल्ली : कंपनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारने कारवाई करत मोठा झटका दिला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल २,०९,०३२ कंपन्यांची खाती सरकारने बंद केली आहेत.
कलम २४८ (५) अन्वये कारवाई करत सरकारने हा निर्णय घेतला. या सर्व कंपन्यांना रजिस्टरमधून काढून टाकण्यात आले आहे. सरकारच्या या झटक्यामुळे कंपन्यांची पळताभूई थोडी झाली असून, अनेक कंपन्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागण्याची चिन्हे आहेत. सरकारच्या आदेशानुसार या कंपन्यांचे संचालक किंवा अधिकारी व्यक्ती या आता त्या कंपन्यांचे अधिकृत संचालक असणार नाहीत. असलेच तर ते माजी संचालक किंवा मजी अधिकारी व्यक्ती असतील. हे लोक आता कंपन्यांच्या बॅंक खात्याचाही बापर करू शकणार नाहीत. जर या मंडळींना तीच कंपनी सुरू करायची असेल तर, पुन्हा पहिल्यापासून कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल.
सरकारने बंदी घातलेल्या कंपन्यांच्या बॅंक खात्यांच्या व्यवहारावरही बंदी घातल्याचे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. अर्थमंत्रालयाच्या सेवा विभागाने भारतीय बॅंक संघाच्या माध्यमातून सर्व बॅंकांना हा संदेश दिला आहे की, बंद करण्यात आलेल्या २,०९,०३२ कंपन्यांच्या बॅंक खात्यांवर बंदी घालण्यासाठी तातडीने पावले उचला. सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर बंदी घालण्यात आलेल्या कंपन्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Deptt.of Financial Services has advised all banks through IBA to take immediate steps to put restrictions on bank accounts of struck-off cos
— Ministry of Finance (@FinMinIndia) September 5, 2017
दरम्यान, सर्वच कंपन्यांसोबत आर्थिक व्यवहार करताना बॅंकांनी विशेष सावधगिरी बाळगावी असेही सरकारने म्हटले आहे.