नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाने थैमान घातलं असतानाच ३ कंपन्यांनी कोरोनाची लस तयार केली आहे. या तिन्ही कंपन्यांना या लशीच्या क्लिनिकल ट्रायललाही मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने तिन्ही कंपन्यांना युद्धस्तरावर ही लस तयार करायला सांगितलं आहे. या तिन्ही कंपन्यांना लस फास्टट्रॅक बनवायला सांगण्यात आलं आहे, त्यामुळे कोरोनाचं संक्रमण रोखलं जाऊ शकतं. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) डॉक्टर वीजी सोमाणी यांनी झी न्यूज डॉटकॉमला याबाबत माहिती दिली.
भारतीय कंपनी ग्लेनमार्क, केडिला हेल्थकेयर आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी कोरोना व्हायरससाठीची लस तयार केली आहे. तिन्ही कंपन्यांना लशी कोरोनाविरुद्ध प्रभावी असल्याचं सुरुवातीच्या संशोधनात दिसलं आहे. आता भारतातल्या हॉस्पिटलमध्ये या लशी रुग्णांना देऊन बघाव्यात, असं कंपनीला सांगण्यात आलं आहे. सुरक्षेमध्ये यशस्वी ठरलेल्या औषधाला लस बनवण्याचं काम दिलं जाईल, असं यासंबंधित एका अधिकाऱ्याने सांगितलं.
पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तयार करण्यात आलेल्या ChAdOx1 लसीची भारतात क्लिनिकल ट्रायल घेणार आहे. ग्लेनमार्कने फाविपीराविर (Favipiravir) नावाची लस तयार केली आहे. तर केडिला हेल्थकेयरने कोरोना व्हायरसला मारण्यासाठी alfa-2b नावाची लस बनवली आहे. याच आठवड्यात या सगळ्या लशींच्या क्लिनिकल ट्रायलला सुरूवात होईल, अशी अपेक्षा आहे.