नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिव्हिजनवर दाखवल्या जाणाऱ्या कंडोमच्या जाहिरातींच्या प्रसारणावर निर्बंध घातले आहेत. यापुढे सकाळी सहा ते रात्री दहा वाजपर्यंत कंडोमच्या जाहिराती दाखवण्यावर बंदी घातलीय. ़
गेल्या काही दिवसापासून सातत्यानं या जाहिरातीविषयी तक्रारी येत असल्याने हे ताकीद देण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलंय. नियमांचं उल्लंघन झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असंही मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलंय.
सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत कंडोमची जाहीरात दाखवू नका, असे स्पष्ट निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत. संपूर्ण कुटुंबासोबत घरात टीव्ही पाहत असताना अचानक लागणाऱ्या कंडोम जाहीरातीमुळे अनेकांची पंचाईत होते. ही जाहिरात सुरु झाल्यानंतर लगेच चॅनल बदलावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन दिवसा आणि रात्री १० वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सनी लिओनीच्या अशाच एक कंडोमच्या जाहीरातीवरुन वाद झाला होता. गुजरातमध्ये नवरात्रीत रस्त्यांवर सनीच्या कंडोमच्या जाहीरातीचे फलक लागले होते. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. कंडोम जाहीराती अश्लील असल्याच्या अनेक तक्रारी मिळाल्या होत्या असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. याचा परिणाम हा लहान मुलांवर होत होता. त्यामुळे अशा जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी होत होती.
यासंबंधी अॅडव्हटायजिंग स्टॅण्डर्डस काऊंसिल ऑफ इंडियाने अशा जाहीरातींना रात्री ११ ते सकाळी पाच या वेळेत परवानगी द्यावी की देऊ, नये याविषयी मंत्रालयाकडे सल्ला मागितला होता. मंत्रालयाने थोडीशी नरमाईची भूमिका घेतली आणि रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कंडोमची जाहीरात दाखवायला परवानगी दिली.