खुषखबर : जीएसटीमुळे आजपासून या वस्तू होणार स्वस्त

 जीएसटीमध्ये कपात झाल्यानंतर आजपासून अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत.

Updated: Jul 27, 2018, 12:08 PM IST
खुषखबर : जीएसटीमुळे आजपासून या वस्तू होणार स्वस्त  title=

मुंबई : जीएसटीमध्ये कपात झाल्यानंतर आजपासून अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. यामध्ये सॅनिटरी नॅपकीन, चप्पल, फ्रीज यासही ८८ सर्वोपयोगी वस्तूंचा यामध्ये समावेश आहे. या वस्तूंवरील वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली. अर्थमंत्री पियूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेने गेल्या आठवड्यात २८ टक्केच्या सर्वात मोठ्या करातून अनेक उत्पादनांना मुक्त करुन त्यांना १८ टक्के कर स्लॅबमध्ये टाकण्यात आलं. फ्रिज, वॉशिंग मशिन, छोट्या स्क्रिनचे टीव्ही, स्टोरेज वॉटर हीटर, पेंट यांच्यावर आजपासून १८ टक्केच जीएसटी लागणार आहे. सॅनिटरी नॅपकिन जीएसटीतून मुक्त केले गेलेयत. याआधी सॅनेटरी नॅपकिनवर १२ टक्के कर आकारण्यात येत होता.

घरगुती उद्योगांनी संरक्षण

या वस्तू जरी स्वस्त झाल्या असल्या तरीही काही महागही झाल्या आहेत. सरकार टीकाऊ ग्राहक वस्तूंवर आयात शुल्क वाढविण्याच्या गृह उद्योगांच्या मागणीवर लक्ष देत असल्याचे अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाचे प्रमुख (सीबीआयसी) अधिकाऱ्याने सांगितले. उद्योग जगतातील संघटनांनी गृहोद्योगांच्या सुरक्षा आणि सिमा शुल्क वाढविण्याची मागणी सरकारकडे केली. 'सरकार नेहमीच्या वापरातील वस्तूंवर आयात शुल्क वाढविण्याच्या विचारात आहे का ?' असा प्रश्न सीबीआयसीचे चेअरमन एस.रमेश यांना विचारण्यात आला. त्यावेळी 'घरगुती उद्योगांनी संरक्षणाची गरज व्यक्त केली आहे. आम्ही त्याच प्रस्तावावर लक्ष देत असल्याचे' त्यांनी यावेळी सांगितले. 

विदेशी वस्तू महाग  

टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन सारख्या वस्तू दैनंदिन वापरामध्ये गणल्या जातात. या वस्तू आयात करताना यावर सीमा शुल्कावर एकीकृत जीएसटी (आयजीएसटी) द्यावा लागतो. जीएसटी दरात कपात केल्यानंतर आयात करणाऱ्यांसाठी आयजीएसटी दरदेखील कमी होणार आहेत. सरकार या वस्तूंवरील इंपोर्ट ड्यूटी वाढवू शकते यामुळे विदेशी कंपन्यांच्या वस्तू महाग होतील.