मुंबई : Monsoon News : यंदा मान्सून देशात लवकरच येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 10 दिवस आधीच मान्सून धडकणार आहे. 21 मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर मान्सून धडकणार असल्याची माहिती एका संस्थेने दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह उकाड्याने हैराण झालेल्या सगळ्यांनाच दिलासा मिळणार आहे.
अंदमान समुद्रावरील वातावरण बदलामुळे आणि कमी होणाऱ्या हवेच्या दाबाच्या स्थितीमुळे मान्सून वेळेवर सुरु होण्यास मदत होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे. या महिन्यात अंदमान समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबामुळे मान्सूनच्या प्रगतीला मदत होईल.
मान्सून, साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये येतो आणि जुलैच्या मध्यापर्यंत उर्वरित भारत व्यापतो, भारताच्या वार्षिक पावसाच्या सुमारे 70 टक्के पाऊस पाडतो. भारतातील जवळपास 40 टक्के निव्वळ पेरणी मान्सूनवर अवलंबून आहे.. भारतातील निम्मे शेती उत्पादन मान्सूनवर अवलंबून असल्याने वेळेआधी मान्सून दाखल होत असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
युक्रेन संघर्षाच्या दरम्यान अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे जागतिक स्तरावर अन्नधान्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर गेल्यामुळे चांगल्या शेती उत्पादनासाठी पाऊस चांगला पडला तर महागाईवर थोडीफार नियंत्रणात येईल, अशी शक्यता आहे. चांगला मान्सून देशांतर्गत उत्पादन वाढवून अन्नधान्याच्या चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल, अशी आशा आहे.