लागोपाठ चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण

सोन्याच्या दरात होणारी घसरण सुरुच...

Updated: Oct 8, 2020, 08:43 PM IST
लागोपाठ चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण  title=

मुंबई : तीन महिन्यात सोन्याचा भाव पुन्हा एकदा 50 हजारांच्या खाली गेला आहे. भारतीय सराफा बाजारात सणांची वाट पाहिली जात आहे. कारण दसरा आणि दिवाळीमध्ये सोन्याची मागणी वाढते. आज सोन्याचा भाव 24 कॅरेटसाठी 50,357 रुपये इतका होता. तर 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,127 रुपये होता. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 50287 आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 46063 रुपये होता.

चांदीबद्दल बोलायचं झालं तर गुरुवारी एमसीएक्सवर चांदीचा भाव 0.23 टक्क्यांनी कमी होऊन 60,280 रुपये प्रति किलो झाला होता. मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीचा दर कमी झाला आहे.

अमेरिकेत मदत निधीबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे किमतींवर दबाव आहे. डॉलरचा भाव देखील कमी झाल्याने सोन्याचे दर कमी झाले आहेत. कॉमेक्सवर सोनं 1,900 डॉलरच्या खाली आहे. अमेरिकेतील निवडणुकीपर्यंत सोन्याचे भाव कमीच राहण्याची शक्यता आहे.

सोनं 2020 च्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये 30 टक्क्यांनी वाढलं आहे. सप्टेंबरमध्ये डॉलर वाढल्यानंतर आता सणांच्या काळात सोनं वाढण्याची शक्यता आहे. कारण भारतात फेस्टिव सीजन दरम्यान सोन्याला मोठी मागणी असते.

वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या रिपोर्टनुसार भारतात जवळपास 653 मेट्रिक टन सोनं आहे. सर्वाधिक गोल्ड रिझर्व्हच्या बाबतीत भारत जगात 9 व्या स्थानावर आहे.

भारतात सोनं आयात ऑगस्टमध्ये वाढून 3.7 अरब डॉलर झालं. जे मागच्या वर्षी याच महिन्यात 1.36 अरब डॉलर होतं. चीननंतर भारतात सोन्याचे सर्वाधिक ग्राहक आहेत. भारतात सोन्यावर 12.5 टक्के आयात शुल्क आणि तीन टक्के जीएसटी लागतो.

7 ऑगस्टला सोन्याचा दर 56,200 रुपये प्रति ग्रॅम झाला होता. आतापर्यंत सोन्याचा भाव 6000 रुपयांनी घसरला आहे. शेअर बाजारात तेजी आल्याने सोन्याचा भाव पडल्याचं देखील जाणकार सांगतात.