मुंबई : सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे आणि त्यासोबतच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तही जवळ आला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं-चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येतं. मात्र, यंदा सोनं खरेदी महागात पडणार असल्याचं दिसत आहे.
यंदाच्या वर्षी १८ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी सोनं खरेदी करणं किंवा गृह प्रवेश करण्यावर अनेकांचा भर असतो. तुम्हीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करात असला तर तुमचा हिरमोड होऊ शकतो. कारण सोन्याच्या दराने ३२ हजारी पार केली आहे.
दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा दर ३२,१०० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. सोन्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ज्वेलर्स विक्रेत्यांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
सोन्याच्या दरात वाढ झाली असताना चांदीही चमकल्याचं दिसत आहे. शनिवारी चांदीच्या दरात २५० रुपयांनी वाढ होत ४०,००० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.
न्यूयॉर्कमधील आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं ०.८३ टक्क्यांनी वाढ होत १३४५.४० डॉलर प्रति औंस वर पोहोचला. तर, चांदीही १.२२ टक्क्यांनी वाढ होत १६.६३ डॉलर प्रति औंसवर पोहोचला.