नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा सज्ज

नववर्षाच्या स्वागतासाठी देशविदेशातील पर्यटकांची गोव्याला जास्त पसंती

Updated: Dec 30, 2018, 04:16 PM IST
नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा सज्ज  title=

प्रताप नाईक, झी मीडिया, मुंबई : ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. मोठ्या सुट्ट्या घेऊन लोक कोकण, गोव्याच्या दिशेने जाऊ लागले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी देशविदेशातील पर्यटकांची गोव्याला जास्त पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळते. देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी गोवा सज्ज झाले आहे. गोव्यातील समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेलेत. गोव्यातील कलंगुट किनाऱ्यावरुन पर्यटकांची धमाल मस्ती पाहायला मिळते. देशविदेशातील पर्यटक गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या बीचवर सध्या मनमुराद आनंद घेत आहेत. निसर्गाची मुक्त उधळण; समुद्रात चिंब भिजण्याचा अनुभव आणि  त्याच्या सोबत वॉटर स्पोर्ट्स ची धमाल ही पर्यटकासाठी पर्वणी ठरत आहे.

पोलीस बंदोबस्त

गोव्यातील बागा बीचवर पर्यटक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटत आहेत. नववर्षाच्या आनंदाला गालबोट लागू नये याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. थर्टीफस्ट आणि नववर्ष स्वागतासाठी गोव्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटीश महिलेवर बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिक दक्षता घेतली आहे.