Crime News : उत्तराखंडची राजधानी देहरादूनतल्या राजपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. रस्त्यावर एक कार बराच वेळापासून उभी होती. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना आता शंका येत होती. कारचा एसी चालू होता त्यामुळे काचांवर धुकं होतं. एका व्यक्तीने अखेर कारमध्ये झाकून पाहिलं तर आतमध्ये एक महिला आणि एक पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्याने त्वरित पोलिसांना फोन केल्यावर ते घटनास्थळी पोहोचले. कार उघडल्यानंतर त्या कपलचा मृत्यू झालाय प्रथमदर्शनी समजलं.
पोलिसांनी त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवली आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार राजपुरातील सहस्रधारा हॅलिपॅडच्या मागे असलेल्या नागलवाडी रोडवर एक कार उभी होती. ज्यात एक पुरुष आणि महिलेचा मृतदेह आढळला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी कारचं इंजिन आणि एसी सुरु होता. एसीचा गॅस आणि तापमानामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. कारमध्ये मृत्यूमुखी अवस्थेत सापडलेले दोघे बऱ्याचदा दारु प्यायले होते अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केलीय.
राजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पी. डी. भट्ट यांच्या नेतृत्त्वात फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळाची पाहणी केली असून त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू अद्याप सापडलेली नाही. कारमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या दोघांची ओळख पटली असून राजेश साहू यांचं वय 50 होतं तर महिलेचे नाव महेश्वरी देवी असून वय 45 होतं. राजेश आणि महेश्वरी देवी यांचे प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर आलीय. महेश्वरी विधवा होत्या, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. ही कार राजेश साहूच्या मालकीची होती. राजेश साहू पेशानं कार चालक होतो. दरम्यान मृतांच्या कुटुंबियांनी आतापर्यंत या प्रकरणात कोणतीही शंका व्यक्त केली नाही. त्यामुळे पोलिसांनी दुर्घनटेची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर त्यांच्या मृत्यूमागील कारणांचा उलगडा होईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.