एकतर्फी प्रेमातून महिलेवर तब्बल १२ वार, आरोपी अटकेत

'वॅलेंटाइन डे'च्या दिवशीच एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. गाजियाबादमधील विजयनगर परिसरात एका माथेफिरु तरुणाने महिलेवर १२ वार केले.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 15, 2018, 04:30 PM IST
एकतर्फी प्रेमातून महिलेवर तब्बल १२ वार, आरोपी अटकेत  title=
Representative Image

नवी दिल्ली : 'वॅलेंटाइन डे'च्या दिवशीच एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. गाजियाबादमधील विजयनगर परिसरात एका माथेफिरु तरुणाने महिलेवर १२ वार केले.

माथेफिरुने केलेल्या या हल्ल्यात पीडित महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने स्वत: पोलीस स्थानक गाठत आत्मसमर्पण केलं.

दहावीची परीक्षा देण्यासाठी आली होती प्रियांका

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांकाचं दहा महिन्यांपूर्वी लोनी परिसरात राहणाऱ्या तरुणासोबत लग्न झालं होतं. त्यानंतर आपल्या दहावीची परीक्षा देण्यासाठी प्रियांका पुन्हा माहेरी आली होती.

असं म्हटलं जात आहे की, आरोपी प्रियांकावर लक्ष ठेवून होता. ज्यावेळी प्रियांका सायंकाळच्या सुमारास घरी परतत होती. त्यावेळी आरोपी आरोपीने तिला गाठलं आणि तिच्यावर सपासप वार केले. 

चार दिवसांपूर्वी काढली होती छेड

प्रियांकाच्या नातेवाईकांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी आरोपी सचिनने आपल्या मित्रांसोबत मिळून तिची छेड काढली होती. या प्रकरणाची पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी ही तक्रार गांभीर्याने घेतली नाही. त्याला केवळ ताब्यात घेवून पुन्हा सोडलं होतं.

हत्येनंतर नातेवाईकांचा गोंधळ

प्रियांकाची हत्या झाल्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशन परिसरात नागरिकांनी आंदोलन करत गोंधळ घातला. तसेच आरोपीला आमच्या स्वाधिन करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. तसेच गोविंदपुरी चौकीच्या प्रभारी पोलिसाला निलंबित करण्यात आलं आहे.