'पुरावे द्या, राजकारणातून निवृत्त होतो'; गौतम गंभीरचं 'आप'ला थेट आव्हान

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघातला भाजपचा उमेदवार गौतम गंभीर याने 'आप'ला थेट आव्हान दिलं आहे.

Updated: May 9, 2019, 11:07 PM IST
'पुरावे द्या, राजकारणातून निवृत्त होतो'; गौतम गंभीरचं 'आप'ला थेट आव्हान title=

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघातला भाजपचा उमेदवार गौतम गंभीर याने 'आप'ला थेट आव्हान दिलं आहे. पूर्व दिल्लीतल्या आपच्या उमेदवार आतिशी यांना पत्रकार परिषदेत आपल्याबद्दलचं वादग्रस्त आणि अपमानास्पद पत्रक वाचून रडू कोसळलं. या पत्रकार परिषदेत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाही उपस्थित होते. 'राजकारणात आल्याबद्दल मी गंभीरचं स्वागत केलं होतं, पण आता भाजप खालच्या स्तरावर गेली आहे,' असा आरोप आतिशी यांनी केला.

या सगळ्या वादावर गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली आहे. गंभीरने या आरोपांना फेटाळून लावलं आहे. 'जर त्यांच्याकडे पुरावा असेल, तर मी तत्काळ राजकारणातून निवृत्त होईन. त्यांनी २३ मेपर्यंत पुरावा दिला, तरी मी राजकारण सोडून देईन. पण जर अरविंद केजरीवाल यांनी पुरावे दिले नाहीत, तर २३ मेनंतर ते राजकारण सोडतील का?' असा सवाल गंभीरने उपस्थित केला.

'माझ्या २ मुली आहे. मी महिलांची इज्जत करतो, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. एवढ्या खालच्या पातळीला कोणी कंस जाऊ शकतं? मला लाज वाटते की हे माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करेन', असा इशारा गंभीरने दिला आहे.

'एक महिला आणि आपल्या सहकाऱ्याच्या अपमान करण्याच्या अरविंद केजरीवाल यांच्या कृत्याची निंदा करतो. फक्त निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही हे करत आहात का? केजरीवाल यांच्यासारखा मुख्यमंत्री दिल्लीला लाभला असल्याची मला लाज वाटते', अशी टीका गंभीरने केली आहे.