मुंबई : गॅस सिलिंडर आपल्या दररोजच्या जगण्याचा भाग आहे. घर लहान असो की मोठे, प्रत्येकाच्या घरात गॅस सिलिंडर असतेच. या गॅस सिलिंडरवर एक विशिष्ट नंबर असतो. तो नक्की काय दर्शवतो याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का? सिलिंडरकडे तुम्ही नीट पाहिल्यास लक्षात येईल की, हा नंबर तर तुमच्या सुरक्षेसाठीच सिलिंडरवर प्रिंट केला जातो.
गॅस सिलिंडर वापरताना त्याच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जाणे महत्वाचे असते. त्यासाठी एक विशिष्ट नंबर सिलिंडरवर दिलेला असतो. या नंबरची सुरूवात A,B,C,D या 4 ग्रुपमध्ये होते. ज्याचा संबध 12 महिन्यांशी असतो.
सिलिंडरच्या क्रमांकाच्या आधी लिहलेल्या A अक्षराचा वापर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांसाठी होतो. तसेच B अक्षराचा वापर एप्रिल, मे, जूनसाठी केला जातो. C अक्षराचा वापर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांसाठी केला जातो. D अक्षराचा वापर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरसाठी करण्यात येतो.
या अक्षरांनंतर येणारे अंक वर्ष दर्शवतात. जर कोणत्या सिलिंडरवर A.20 लिहलेले असेल तर, त्याचा अर्थ 2020 चा जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्चचा महिना!
ही तारीख नक्की असते कशाची?
गॅस सिलिंडरवरची ही तारीख खाद्यपदार्थाप्रमाणेच एक्सपायरी डेट दर्शवत असते. जर सिलिंडरवर B.21 लिहले असेल तर तुमचे सिलिंडर एप्रिल, मे किंवा जून 2021 मध्ये एक्सपायर होणार आहे.
एवढेच नाही तर, हा नंबर सिलिंडरच्या चाचणीवेळीदेखील सांगितला जातो. अशावेळी तुमच्याकडे असलेल्या सिलिंडरची चाचणी तारीख किंवा एक्सपायरी डेट होऊन गेली असेल तर, सिलिंडर वापरणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.