मुंबई : गेल्या जवळपास 2 वर्षांपासून कोरोनाने थैमान घातलं आहे. सध्या देशातील नागरिक कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करतायत. दररोज 2 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होताना दिसतेय. दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पहायला मिळतोय. अशातच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी दावा केला आहे की, मुंबई आणि दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट पीकवर पोहोचली आहे.
प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांच्या म्हणण्याप्रमाणे, मुंबई आणि दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव पीकवर असल्याचं दिसून येतंय. जानेवारीच्या शेवटपर्यंत पीक राहणार आहे. त्यानंतर हळूहळू कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागतील. 15 जानेवारीनंतर मुंबईत आणि पुढील आठवड्यापासून दिल्लीत कोरोनाची प्रकरणं कमी होण्यास सुरुवात होईल.
IIT कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं की, कोरोना आणखी एक महिना थैमान घालेल. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना पीकवक पोहोचेल. 15 फेब्रुवारीपासून नव्या रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात होईल. तिसरी लाट मार्चपर्यंत संपेल, असा दावाही अग्रवाल यांनी केलाय.
देशात जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव पीकवर असेल तेव्हा दररोज 7 ते 8 लाख रुग्णांची नोंद होईल. पण संसर्ग जितक्या वेगाने वाढेल तितक्या लवकर तो कमी देखील होईल. ज्या शहरांमध्ये केसेस कमी आहेत तिथे केसेस वाढू शकतात, असंही ते म्हणालेत.
दिल्ली इन्स्टिटय़ूट ऑफ लिव्हर अँड बिलीरी सायन्सच्या अभ्यासानुसार, डिसेंबरमध्ये दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचं प्रकरण समोर आलं होतं. तर आता कम्युनिटी ट्रान्समिशन होण्याची चिन्हं दिसतायत.
विशेष म्हणजे ओमायक्रॉनची लागण तरुणांना अधिक होताना दिसली. एकूण संक्रमण झालेल्या नमुन्यांपैकी 35% हे तरुण होते. यामध्ये फक्त 3.5% रूग्णालयात दाखल होण्याची गरज भासली. पूर्वीच्या सर्व कोरोना व्हेरिएंटप्रमाणे, उच्च रक्तदाब आणि डायबेटीसच्या रूग्णांवर याचा परिणाम अधिक दिसून आला.