माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले.मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी अटजींना मुखाग्नी दिली.

Updated: Aug 17, 2018, 05:23 PM IST
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन title=

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रीय स्मृती स्थळावर हे अंत्यसंस्कार पार पडले. मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी अटलींना मुखाग्नी दिला. त्यापूर्वी अटलजींना लष्कराच्या ३०० जवानांनी मानवंदना दिली. तीनही सेनादलांकडून पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. अटलींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांना अश्रू अनावर झाले होते.

अटलजींना अखेरचा निरोप देण्यासाठी लोटला जनसागर

अटलींच्या अंत्ययात्रेला दिल्लीत लाखो लोकांनी गर्दी केली होती. एका फुलाने सजवलेला ट्रकवर अटलजींचं पार्थिव होतं, यामागे हजारो नागरिक, कार्यकर्ते धावत होते. अटलबिहारी वाजपेयी यांना निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. अटल बिहारी वाजपेयी यांना निरोप देण्यासाठी भाजपाचे देशभरातील नेते आणि पदाधिकारी कालच दिल्लीत दाखल झाले होते.

अटलींना निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पायीच अंत्ययात्रेत

अटलजींच्या अंतयात्रेत ट्रक मागे चालत होते, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्यासोबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अंत्ययात्रेत पायी चालताना दिसले.

यानंतर राष्ट्रीय स्मृती स्थळावर, भाजपाचे दिग्गज आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह तसेच आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित होते. यावेळी अफगाणिस्तानचे हमीद करजई, भुतानचे राजे, नेपाळचे पंतप्रधान देखील उपस्थित होते.