बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी राज्यसभेवर जाणार

भाजपमध्ये या राज्यसभा जागेसाठी अनेक दावेदार होते.

Updated: Nov 27, 2020, 10:06 PM IST
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी राज्यसभेवर जाणार title=

पटना : राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी एनडीएचे उमेदवार असतील. राष्ट्रीय सरचिटणीस व प्रभारी अरुण सिंग यांनी शुक्रवारी सुशील मोदी यांच्या नावाची घोषणा केली. भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी हे 2005 पासून नितीशकुमार यांच्या आधीच्या सरकारमधील महाआघाडीचा काळ वगळता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते. नव्या सरकारमध्ये त्यांना कोणतेही पद देण्यात आले नव्हते. तेव्हापासून भाजप त्यांना राज्यसभेवर पाठवेल अशी शक्यता वर्तवली जात होती. भागलपूरचे खासदार राहिलेले सुशील मोदी पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून जातील. सुशील मोदी हे 2005 पासून विधानपरिषदेचे सदस्य आहेत. ते बिहार विधानसभेचे सदस्यही राहिले आहेत.

माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बिहारमधील एकमेव राज्यसभेच्या जागेसाठी 14 डिसेंबरच्या आधी निवडणूक होऊ शकते. लोकसभा निवडणुकीत जागावाटपाच्या वेळी भाजपने पासवान यांना आपल्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवले होते. या जागेवर एलजेपीची नजर होती. पासवान यांच्या पत्नी रिना पासवान यांच्यासाठी एलजेपीला ही जागा हवी होती. राष्ट्रीय पातळीवर एलजेपी एनडीएचा मित्रपक्ष आहे.

विधानसभेच्या सभापतींच्या निवडणुकीप्रमाणे जर महाआघाडीने जरी उमेदवार दिला तरी विजय एनडीएचाच होईल. कोणताही पक्ष एकटा बहुमताचा आकडा नाही गाठू शकत. त्यामुळे भाजपला जेडीयू तसेच हम आणि व्हिआयपी पक्षाची देखील मदत घ्यावी लागेल. सुशीलकुमार मोदी यांच्या नावाला जेडीयूकडून विरोध नसेल. कारण ते नितीश कुमार यांच्या जवळचे मानले जातात. तसेच त्यांचे अनेक नेत्यांसोबत चांगले संबंध देखील आहेत. सुशील मोदी हे गेल्या तीन दशकांपासून बिहारमधील भाजपचे पहिल्या फळीतील नेते आहेत. सुशील मोदींच्या नावावर इतर पक्षांच्या एनडीएच्या आमदारांना एकत्र ठेवण्यातही भाजपला मदत होईल.

भाजपमध्ये या राज्यसभा जागेसाठी अनेक दावेदार होते, परंतु एलजेपी आणि जेडीयू यांच्यातील कटु संबंधांमुळे भाजपला आपल्या एकमत झालेल्या उमेदवाराचे नाव पुढे करावे लागले. त्यासाठी सुशील मोदी यांच्या नावाची चर्चा होती. ते बिहारमधील भाजपचे पहिले नेते आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी असलेले त्यांचे निकटचे संबंध यामुळे जेडीयूला ही त्यांच्या नावावर आक्षेप नाही.