बंगळुरू: देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. सोशल मीडियावरील निराधार आणि चुकीची माहिती या दहशतीत आणखीनच भर घालत आहे. याच दहशतीने कर्नाटकमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याचा बळी घेतला. सोशल मीडियावरील कोरोनाविषयीची माहिती वाचून हा माणुस प्रचंड घाबरला होता. याच भीतीपोटी त्याने गळफास लावून स्वत:चे जीवन संपवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या उडिपी जिल्ह्यात हा प्रकार घडला. येथील उपूर गावातील गोपाळकृष्णन यांनी बुधवारी गळफास लावून आत्महत्या केली. गोपाळकृष्णन कर्नाटक सरकारच्या रस्ते वाहतूक महामंडळात कामाला होते.
पोलिसांनी गोपाळकृष्णन यांच्या मृतदेहाशेजारी एक चिठ्ठी सापडली. यामध्ये त्यांनी आपल्या कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले आहे. माझ्या कुटुंबाला यापासून सुरक्षित ठेवण्यात यावे, असेही त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. प्राथमिक चौकशीत गोपालकृष्णन यांना कोरोनाची लागण झालीच नसल्याचे समोर आले. परंतु, सोशल मीडियावरील माहिती वाचून ते प्रचंड घाबरले होते. यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
याविषयी त्यांच्या कुटुंबीयांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, गोपालकृष्णन यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नव्हती. आदल्या रात्रीच ते आमच्याशी कोरोनाविषयी बोलत होते. पहाटे साडेपाच वाजता गोपाळकृष्णन त्यांच्या बिछान्यावर दिसले नाहीत. तेव्हा ते मॉर्निंग वॉकला गेले असतील, असा कुटुंबीयांचा समज झाला. मात्र, सकाळ होऊन बराच वेळ उलटल्यानंतरही ते न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली. त्यावेळी घरामागील झाडावर त्यांचा मृतदेह लटकताना आढळून आला. त्यांचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्याता आहे. आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.