'सरकारने गरिबांच्या खात्यात तातडीने ७५०० रूपये जमा करावेत'

२१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांना मोठा फटका बसणार आहे. 

Updated: Mar 26, 2020, 03:07 PM IST
'सरकारने गरिबांच्या खात्यात तातडीने ७५०० रूपये जमा करावेत' title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे गरिबांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे सरकारने जनधन खातेधारक, पंतप्रधान किसान योजना आणि मनरेगा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये तातडीने ७५०० रुपये जमा करावेत, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली.

देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रात सोनिया गांधी यांनी लॉकडाऊनला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच कोरोनाच्या साथीला आळा घालण्यासाठी काँग्रेस केंद्र सरकारची सर्वतोपरी मदत करेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

मात्र, २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांना मोठा फटका बसणार आहे. अशा लोकांना तातडीने मदत पुरवण्याची गरज आहे. त्यासाठी देशातील रेशन कार्डधारक कुटुंबांना १० किलो तांदूळ किंवा गहू मोफत द्यावे, अशी मागणी सोनियांनी केली आहे.

तसेच नोकरदार वर्गाला दिलासा देण्यासाठीही सोनिया यांनी मोदी सरकारला काही पर्याय सुचविले आहेत. यामध्ये नोकरदार वर्गाला पुढील सहा महिने कर्जाचे हप्ते (EMI) न भरण्याची मुभा देण्यात यावी, असे म्हटले आहे. तसेच या सहा महिन्यांच्या कालावधीत कर्जावरील व्याजाची रक्कमही बँकांनी माफ करावी, अशी मागणीही सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे केली. 

देशातील लघूमध्यम उद्योग अगोदरच संकटात आहेत. आता कोरोनामुळे या उद्योगांसमोर आणखी बिकट समस्या निर्माण होतील. त्यामुळे केंद्र सरकारने या क्षेत्रासाठी करमाफी किंवा कर्जमाफीसारख्या योजनांचा विचार करावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.

 

याशिवाय, केंद्र सरकारने तात्पुरत्या काळासाठी नव्या आरोग्य सुविधांची निर्मिती करावी. आगामी काळात ज्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे, तेथील नजीकच्या परिसरात अतिदक्षता विभागांची संख्या वाढवावी. याशिवाय, कोरोनाच्या रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या व्हेंटिलेटर्सच्या निर्मितीसाठी तात्पुरते कारखाने सुरु करण्यात यावेत. तसेच या सगळ्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपकरणे देण्यात यावीत, असेही सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.