Independence Day In naxal affected bastar : देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिवसाची तयारी आता सर्वत्र सुरू झाली आहे. राष्ट्राचा उत्सव साजरा करण्यासाठी भारतीय उत्सुक झालेत. अनेकांनी स्वातंत्र्यदिनासाठी कपडे देखील कडक इस्त्री करून ठेवले आहेत. मात्र तुम्हाला माहितीये का? भारतातील 13 गावं अशी आहेत, ज्या गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झेंडा फडकवला जाणार आहे. अशी कोणती गावं आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत तिरंगा फडकवला नाही? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं कारण देखील जाणून घेऊया.
भारतातील अशी 13 गावं आहेत, जी यंदा पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकावणार आहेत. ही गावं छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित क्षेत्रामध्ये होती. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तरमधील पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनाच्या तयारीची पूर्ण तयारी झाली आहे. गेल्या 7 महिन्यांत या गावांमध्ये सुरक्षा दलांच्या नवीन छावण्या तयार करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिलीये.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त नेरलीघाट (दंतेवाडा जिल्हा), पानिडोबीर (कांकेर), गुंडम, पुटकेल आणि छुटवाही (विजापूर), कस्तुरमेट्टा, मसपूर, इराकभट्टी आणि मोहंडी (नारायणपूर), टेकलगुडेम, पूर्ववर्ती, लखापाल आणि पुलनपद (सुकमा) गावात तिरंगा फडकवला जाईल, अशी माहिती बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिली आहे. या गावात नव्या छावण्या उभारण्यात आल्या होत्या. त्यानंतर या परिसराला एक वेगळी ओळख निर्माण झाली.
गेल्या प्रजासत्ताक दिनानंतर पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा शिबिरं आयोजित केली अन् नव्या छावण्या निर्माण केल्या. तर शिबिरांमुळे शासकीय कल्याणकारी योजना आदिवासींपर्यंत पोहोचण्यास मदत होत असल्याचं पोलीस महानिरीक्षक सुंदरराज यांनी सांगितलं. अनेक वर्ष ज्यांनी स्वातंत्र्य पाहिलं नाही, अशा लोकांसाठी ही ऐतिहासिक क्षण असणार आहे. तर परिसरात कोणतीही गडबड होऊ नये म्हणून माओवादग्रस्त भागात सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिलीये.