'आधी पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवा, मग नरेंद्र मोदींशी लढा'

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्व विरोधी पक्षांची एक बैठक सोमवारी नवी दिल्लीमध्ये होते आहे. नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचे याच बैठकीत निश्चित केले जाईल.

Updated: Dec 10, 2018, 12:18 PM IST
'आधी पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवा, मग नरेंद्र मोदींशी लढा' title=

कोलकाता - आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून पायउतार करण्यासाठी एकजूट झालेल्या विरोधकांवर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी हल्ला चढवला. मोदी यांचे सरकार खाली खेचण्याचे नंतर पाहू, आधी विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण आहे, ते त्यांनी जाहीर करावे, असे थेट आव्हानच विजयवर्गीय यांनी दिले आहे. आमच्याविरूद्ध लढण्यासाठी सगळे विरोधक एकत्र येत आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे. पण आधी त्यांनी आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित करावा आणि नंतर आमच्याशी लढण्याचे ठरवावे, असे त्यांनी म्हटले.

लोकसभा निवडणुकीला आता अवघे सहा महिने राहिले आहेत. त्यातच मंगळवारी देशातील पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्व विरोधी पक्षांची एक बैठक सोमवारी नवी दिल्लीमध्ये होते आहे. नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचे याच बैठकीत निश्चित केले जाईल. भारतीय जनता पक्षाविरोधात निवडणुकीमध्ये महाआघाडी करण्याचा निर्णयही या बैठकीत निश्चित होईल. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर कैलाश विजयवर्गीय यांनी वरील मुद्दा उपस्थित केला. 

आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीच आहेत. आता विरोधकांनी त्यांचे पतंप्रधानपदाचे उमेदवार कोण आहेत, हे आधी जाहीर करावे, असे विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दिल्लीत दाखल झाल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनाच आगामी निवडणुकीत विरोधकांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार केले जाणार आहे. याबद्दल दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

दरम्यान, भाजपचे आणखी एक नेते मुकुल रॉय यांनीही ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. केंद्रातील विरोधकांच्या महाआघाडीत काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचाही समावेश आहे. हे दोन्ही पक्ष पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे मित्र पक्ष आहेत की विरोधक हे त्यांनी आधी जाहीर करावे. १९९८ मध्ये जेव्हा तृणमूळ काँग्रेसची निर्मिती झाली, त्यावेळी खुद्द ममता बॅनर्जी यांनी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही आमचे विरोधक असल्याचे म्हटले होते. तृणमूळ काँग्रेसने आतापर्यंत कायम कम्युनिस्ट पक्षाचा विरोध केला. आता ते मित्र होणार का, याबद्दलही त्यांनी खुलासा करावा, असे मुकुल रॉय यांनी म्हटले आहे.