नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या देशभरात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीबाबत प्रयोग सुरू आहेत. प्लाझ्मा थेरपीच्या परवानगीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
भारतात पहिल्यांदाच दिल्लीत प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून कोरोनाच्या रुग्णावर उपचार सुरू आहेत. दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीमध्ये एकाच कुटुंबातल्या ४ जणांना कोरोना झाला होता. या कुटुंबातल्या पित्याचा बुधवार, १५ एप्रिलला मृत्यू झाला आहे. तर मुलगी आणि आई बरी झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या कुटुंबातील मुलाला व्हॅन्टिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
दिल्लीच्या साकेतमधल्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये या रुग्णावर उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलने सरकारकडून प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्याची परवानगी मागितली होती. याला सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या रुग्णावर प्लाझ्मा थेरपीने उपचारांना सुरुवात झाली आहे. कोरोनाग्रस्तावर प्लाझ्मा थेरपीने पहिल्यांदाच उपचार होत आहेत.
जर एखादी व्यक्ती कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बरी झाली असेल, तर त्याच्या शरिरात या व्हायरसला निकामी करणाऱ्या एंटीबॉडीज तयार होतात. या एंटीबॉडीजच्या मदतीने कोरोना झालेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरिरातील व्हायरसही संपवला जाऊ शकतो.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते कोणताही रुग्ण बरा झाल्यानंतर १४ दिवसांनी त्याच्या शरिरातून एंटीबॉडीज घेतल्या जाऊ शकतात. यासाठी बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरिरातून रक्त काढलं जातं. रक्तामध्ये असलेल्या एंटीबॉडीज फक्त प्लाझ्मामध्येच असतात, त्यामुळे रक्तातून प्लाझ्मा काढून रक्त पुन्हा त्या रुग्णाच्या शरिरात टाकलं जातं.
प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांवर केला जाऊ शकतो. प्लाझ्मा थेरपीने उपचार सुरू केल्यानंतर ४८ ते ७२ तासात रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते, असा दावा तज्ज्ञ डॉक्टरांनी केला आहे. आयसीएमराने मंजुरी दिल्यानंतर आता देशभरात प्लाझ्मा थेरपीवर काम सुरू झालं आहे.