वैवाहिक जीवन सुखकारक होण्यासाठी आर्थिक “सप्तपदी ”महत्वाची

लग्न म्हणजे काय? आयुष्यभर सोबत राहणारा एक जोडीदार...

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 11, 2018, 01:03 PM IST
 title=

मुंबई : लग्न म्हणजे काय? आयुष्यभर सोबत राहणारा एक जोडीदार...

एक नवीन नातं, आपुलकी प्रेम,  पुढील सात जन्मासाठी बांधला गेलेला जोडीदार असे काहीसे आपण म्हणतो. लग्नात एकमेकांसोबत घेतलेली सात पाऊलं आणि प्रत्येक पाऊलाचे एक वचन अशी सात वचनं जोडीदाराला दिली जातात. जी वचनं दोघांना आयुष्यभर मानसिक, भावनिक दृष्ट्या बांधून ठेवतात म्हणून लग्नामध्ये या सप्तपदींना खूप महत्व असते. या खूप महत्वाच्या दिवशी आपण अग्नीला साक्षी ठेऊन आयुष्यभर एकमेकांसोबत आयुष्य व्यतीत करायचे वचन देतो. असेच वचन आपण आर्थिक जीवनातसुद्धा दिले तर... लग्नानंतर येणारा आर्थिक ताण-तणाव कमी होईल.

आजकाल अरेंज मॅरेजमध्ये आर्थिक स्थैर्य पाहिले जाते. हे आर्थिक स्थैर्य कायम म्हणजे आयुष्यभर असेलच याबद्दल कोणीही विश्वास देऊ शकत नाही. पण जोडिदाराने व्यवस्थीत आपले आर्थिक नियोजन केले अर्थात फायनाशियल प्लॅनिंग केले तर त्यांना खूपच फायदेशीर होईल. आर्थिक जीवनात आपण एक एक पाऊल व्यवस्थित टाकणे खूपच महत्वाचे असते कारण त्याचा परिणाम हा संपूर्ण कुंटुंबावर होणारा असतो. दोघांनी विचारपूर्वक आर्थिक व्यवहार केले तर जीवन सुलभ होईल शिवाय ताणविरहीत ठरेल.

पुढील आर्थिक सप्तपदी तुमच्या आयुष्यात विलक्षण बदल करतील हे नक्की. आयुष्यात मानसिक, शारीरीक, इतर सर्व गोष्टी बरोबरच आर्थिक सामंजस्य ही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे आपले आयुष्य सुरुळीत राहण्यासाठी मदत होते. आपल्या कुटुंबावर येणाऱ्या आरोग्य विषयक संकटे किंवा काही आर्थिक संकटे यासाठी आपण नेहमी तयार राहावे यासाठी तयार केलेली ही सप्तपदी तुम्ही नक्की आजमावून पहा.

आर्थिक सप्तपदी प्रत्येक पाऊल पुढीलप्रमाणे

पाहिले पाऊल : आपले उत्पन्न – तुमचे सर्व उत्पन्न ज्यामध्ये नेट प्रॉफिट, शेअर्स म्युचअल फंड यावर मिळालेला डिव्हीडनट, कंपनी फिक्स डीपोझीट, इंटरेस्ट या सर्व उत्पन्नासाठी एकच बँक खाते असावे. फार तर नेट बिजनेस इन्कमचे खाते वेगळे ठेवा. म्हणजे आपल्या सर्व उत्पन्नातून आपण किती कमावतो ते आपल्याला स्पष्ट कळते.

दुसरे पाऊल : आपला खर्च - दुसरे पाऊल म्हणजे खर्चाचे. सर्व खर्च डेबिट कार्ड ने किंवा चेक ने केल्यास तुम्ही केलेल्या प्रत्येक खर्चाचा हिशोब तुमच्याकडे राहतील. त्यावरून तुम्हाला तुमच्या खर्चाचा अंदाज येतो. नेमक्या उत्पन्नात आपण किती खर्च करावा आणि सेविंगमध्ये सातत्य कसे ठेवावे याचा नेमका अंदाज पहिल्या दोन पाऊलातच आपल्याला येतो.

तिसरे पाऊल : आपली गुंतवणुक - आपले उत्पन्न आणि खर्च यानंतर महत्वाचा टप्पा म्हणजे गुंतवणुक. सर्वसामान्य व्यक्ती सोन्यामध्ये अधिक खर्च करते. पण आपल्या अधिक फायदा देणाऱ्या फायनाशियल योजना याचा अभ्यास करावा लाईफ इन्सुरन्स, शेअर ब्रोकर, म्युचअल फंड या सर्वासाठी अभ्यासू, या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीशी भेटून आपली गुंतवणूक सांभाळण्यासाठी एजेन्ट ठेवावा.

चौथे पाऊल : गुंतवणुकीची अती महत्वाची साधने - प्रत्यक्ष गुंतवणूक करताना आपल्या पुढे अनेक साधने असली तरी नेमकी आवश्यक आणि अती उपयुक्त साधनांची निवडकरण्याची तयारी म्हणजे करावी चौथे पाऊल. टर्म इन्शुरन्स, शेअर्स पोर्टफोलीओ मध्ये २०/२५ शेअर्स, बॅंक डिपॉझीट (ईम्रजन्सी), म्युचल फंड च्या दहा योजना ज्यात पेंशन फंड असेल.  

पाचवे पाऊल : करपात्र / करमुक्त अभ्यास - टॅक्सचा अभ्यास हा आर्थिक नियोजनात खूप महत्वाचा आहे. आपल्या सर्व उत्पन्नांवर आणि गुंतवणुकीतून कोणते उत्पन्न करपात्र ठरतं आणि कोणते उत्पन्न करमुक्त याचा लेखाजोगा मांडायच. भविष्यातील उत्पन्नाचा वेध घेताना करदायित्व कमी कसे करता येईल याची रूपरेषा या पाचव्या पाऊलात करावी.

सहावे पाऊल : आपल्या आर्थिक व्यवहाराची नॉमिनी - सर्व गुंतवणुकी जॉईननेम आणि त्यांना नॉमिनेशन केली असल्याची खातरजमा करून घ्यावी.

सातवे पाऊल : मृत्युपत्र - सर्वात महत्वाचे पाऊल म्हणजे कौटुंबिक गरज आणि परिस्थिती लक्षात घेऊन भावनिक न होता मृत्युपत्र बनवणे त्याची रजिस्टरकडे नोंदणी करणे.