Chandrayaan 3 लँड होताच अभिमानाने छाती उंचावलेला बाप ढसाढसा रडला, म्हणाले 'आज माझ्या पोराने...'

चांद्रयान 3 चंद्रावर लँड झाल्यानंतर संपूर्ण देशात उत्साहाचं वातवारण असून, सेलिब्रेशन केलं जात आहे. दरम्यान, जेव्हा चांद्रयाने 3 ने लँडिंग केलं तेव्हा प्रकल्प संचालक विरामुथुवेल यांचे वडील पलानीवेल यांना अश्रू अनावर झाले होते.   

शिवराज यादव | Updated: Aug 24, 2023, 12:07 PM IST
Chandrayaan 3 लँड होताच अभिमानाने छाती उंचावलेला बाप ढसाढसा रडला, म्हणाले 'आज माझ्या पोराने...' title=

चांद्रयान 3 ने चंद्रावर लँडिंग केलं आणि संपूर्ण देशभरात एकच जल्लोष सुरु झाला. अभिमानाने छाती उंचावलेल्या कित्येत भारतीयांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. एका ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार झाल्याचा अनुभव गाठीशी बांधून, अनेकांनी सेलिब्रेशन केलं. दरम्यान, या भारतीयांमध्ये प्रकल्प संचालक पी विरामुथुवेल यांचे वडील पलानीवेलदेखील होते. चंद्रावर लँडिंग होताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहण्यास सुरुवात झाले होते. टीव्हीवर लाईव्ह पाहताना आपल्या मुलाच्या कामगिरीमुळे अभिमानाने छाती उंचावलेला बाप ढसाढसा रडत होता. आपल्या मुलाने फार मेहनत घेतली असून, आपल्याला फार आनंद झाल्याच्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या. 

पी विरामुथुवेल यांच्या वडिलांनी घऱात टीव्हीवर चांद्रयान 3 चं लँडिंग लाईव्हा पाहिलं. यावेळी इतर भारतीयांप्रमाणे तेदेखील इस्रोच्या वैज्ञानिकांसाठी जल्लोष करत होते. पण आपला मुलगाही या मोहिमेचा भाग असल्याने त्यांच्या भावना इतरांपेक्षा वेगळ्या होत्या. 

आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की, "आज चांद्रयान 3 अत्यंत यशस्वीपणे चंद्रावर लँड झालं आहे. फक्त तामिळनाडू नाही तर भारतातील प्रत्येक नागरिकाला याचा आनंद आहे. मला प्रचंड आनंद झाला आहे. एक बाप म्हणून, मी हा आनंद तुमच्यासह वाटत आहे". 

दरम्यान चांद्रयान 3 ने दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर यशस्वीपणे लँडिंग केल्यानंतर पी विरामुथुवेल यांच्या घरी लोकांनी शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती. चांद्रयान 3 चे प्रोजेक्ट मॅनेजर पी विरामुथुवेल यांचे वडील रेल्वे कर्मचारी होते. पी विरामुथुवेल यांनी एका खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमधून आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं. यानंतर उच्च शिक्षणासाठी ते मद्रास आयआयटीत गेले. पी विरामुथुवेल यांचं आधीपासूनच आंतराळ वैज्ञानिक होण्याचं आणि इस्रोमध्ये जाण्याचं स्वप्न होतं. 

पलानीवेल यांनी सांगितलं आहे की, जेव्हा मी चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणासाठी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये गेलो होतो तेव्हा वरिष्ठ वैज्ञानिकांनी अभिनंदन करत माझ्यासह फोटो काढले. "तो कधीच माझ्याशी या मोहिमेबद्दल बोलला नाही. त्याने फार मेहनत घेतली आहे. कधी कधी तर कुटुंबीयांनाही भेट नसे," असं पलानीवेलदेखील यांनी सांगितलं आहे.

भारताने बुधवारी चंद्रावर लँडिग करत इतिहास रचला आहे. याचं कारण चंद्रावर पोहोचण्याची कामगिरी करणारा भारत हा पहिला देश असला तरी, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिलाच देश ठरला आहे. अमेरिका, चीन, रशिया यांनी या मोहिमांसाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च केले आहेत. पण भारताच्या वैज्ञानिकांनी फक्त 600 कोटी रुपयांत ही कामगिरी करुन दाखवली आहे.