...तर तुमचा FASTag उद्यापासून होणार बंद, आजच्या आज करा 'हे' काम

FASTag KYC: टोलनाक्यांवर वाहनांची सुरळीत वाहतूक होण्यासाठी तसंच इलेक्ट्रॉनिक टोलवसुली प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी FASTag केवायसी तपासणी सुरु करण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 31, 2024, 06:55 PM IST
...तर तुमचा FASTag उद्यापासून होणार बंद, आजच्या आज करा 'हे' काम title=

FASTag KYC: जर तुम्ही पुढील काही दिवसांमध्ये रस्त्याने लांबचा प्रवास करणार असाल तर सावध व्हा. याचं कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टटॅगचं केवायसी करण्यासाठी दिलेली मुद आज म्हणजेच 31 जानेवारीला संपत आहे. जे केवायसी करण्यास असमर्थ ठरतील त्यांची फास्टटॅग 1 फेब्रुवारीपासून निष्क्रीय होतील. फास्टटॅग ही वाहनांसाठी देण्यात आली प्री-पेड सुविधा आहे. यामुळे वाहनांना टोलनाक्यावर पैसे देण्यासाठी थांबावं लागत नाही आणि वाट न पाहता किंवा तेथील ट्रापिकमध्ये ताटकळत न राहता सुरळीत प्रवास करता येतो. 

फास्टटॅग हा कारच्या पुढील काचेवर चिकटवलेला असतो. एखादं वाहन टोलनाक्यावरुन जात असताना हा फास्टटॅग स्कॅन केला जातो आणि त्या खात्यातून टोलचे पैसे वजा केले जातात. अशाप्रकारे चालकाला टोलनाक्यावर गाडी थांबवून पैसे देण्याची गरज भासत नाही आणि वेळेची बचत होते. 

टोलनाक्यांवर वाहनांची सुरळीत वाहतूक होण्यासाठी तसंच इलेक्ट्रॉनिक टोलवसुली प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी FASTag केवायसी तपासणी सुरु करण्यात आली आहे. एका वाहनासाठी एकापेक्षा जास्त FASTag जारी करण्यात आले असल्याचं आणि आरबीआयच्या आदेशाचे उल्लंघन करून केवायसीशिवाय FASTag जारी केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने ही कारवाई सुरु केली आहे.

फास्टटॅग केवायसी अपडेटसाठी आता शेवटच्या क्षणी नेमकं काय करावं?

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गतवर्षी डिसेंबर महिन्यात नोटिफिकेशन जारी करत 31 डिसेंबर शेवटची तारीख असेल असं जाहीर केलं होतं. पण जर ही तारीख तुमच्या लक्षात राहिली नसेल आणि तुम्हीही केवायसी अपडेट न करणाऱ्यांच्या यादीत असाल तर काय करायचं हे समजून घ्या. 

- अनेक बँकांच्या शाखा दुपारी 4 वाजता बंद होतात. त्यामुळे लोकांना ऑनलाइन सुविधांवर अवलंबून राहावं लागणार आहे. 
- तुमचा RFID दस्तऐवज जारी केलेल्या बँकेची FASTag वेबसाइट उघडा. आवश्यक पेजवर जाण्यासाठी तुम्ही 'FASTag' या कीवर्डसह वेबसाइटचे नाव Google करू शकता.
- तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर वापरत लॉग इन करा आणि मेसेजमध्ये आलेला ओटीपी टाका. 
- My Profile सेक्शनमध्ये जा, आणि KYC टॅबवर क्लिक करा. 
- पत्ता पुरावा सारखे आवश्यक तपशील भरल्यानंतर सबमिट करा आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर केवायसी पेजवर तुमची केवायसी स्थिती दिसेल. 

FAStag केवायसीसाठी लागणारी कागदपत्रं

- वाहनाचं रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
- ओळखीचा पुरावा
- पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट साइज फोटो

पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून वापरता येईल.