Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर (Bharat Jodo Nyay Yatra) आहेत. राहुल गांधी बिहारच्या किशनगंजमध्ये 6 वर्षाच्या मुलाने त्यांची भेट घेतली. यावेळी मुलाने राहुल गांधींना काही प्रश्न विचारले. पण त्याचा एक प्रश्न ऐकताच राहुल गांधीही काही वेळ आश्चर्याने पाहू लागले. याचं कारण चिमुरड्याने थेट राहुल गांधी यांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं.
अर्श नवाज असं या मुलाचं नाव असून तो युट्बूबर आहे. त्याने राहुल गांधींची भेट घेत त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. अर्शने राहुल गांधींवरही व्लॉग तयार केला आहे. तसंच त्यामध्ये राहुल गांधी भविष्यातील पंतप्रधान असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
6 वर्षाच्या अर्शने या भेटीदरम्यान राहुल गांधी यांना लग्नाबद्दल विचारलं. तुम्ही लग्न कधी करणार आहात? असा प्रश्न त्याने विचारताच राहुल गांधी आश्चर्याने पाहू लागले. यानंतर त्यांना चिमुरड्याला उत्तर दिलं की, सध्या तरी मी काम करत आहे. जेव्हा काम संपेल तेव्हा करेन.
हा व्हिडीओ 29 जानेवारीचा आहे. व्हिडीओत मुलाने घरात निघण्यापासून ते राहुल गांधींची भेट होईपर्यंतचा प्रवास दाखवला आहे.
यादरम्यान एका 6 वर्षांच्या मुलाने राहुल गांधींना तुम्ही कधी लग्न करणार आहात अशी विचारणा केली.
राहुल गांधी सध्या मणिपूर ते मुंबई प्रवासात आहेत. ही यात्रा एकूण 6700 किलोमीटरचा टप्पा पार करणार आहे. दरम्यान आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवर हल्ला करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं होतं. गाडीच्या काचा फुटल्याचे काही फोटो, व्हिडीओही समोर आले होते.
दरम्यान काँग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती खोटी असल्याचं सांगितलं आहे. 'पश्चिम बंगालमधील मालदा येथे राहुल गांधींना भेटण्यासाठी मोठा जनसमुदाय आला होता. या गर्दीत राहुल गांधींना भेटण्यासाठी अचानक एक महिला त्यांच्या कार समोर आली, त्यामुळे अचानक ब्रेक लागला. त्यानंतर सुरक्षा वर्तुळात वापरलेल्या दोरीमुळे गाडीची काच फुटली', अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
राहुल गांधी जनतेवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध न्यायासाठी लढा देत आहेत. जनता त्यांच्यासोबत आहे, जनता त्यांना सुरक्षित ठेवत आहे, असं म्हणत काँग्रेसने भाजपाला टोला लगावला आहे.