कर्नाटक : भोंग्यावरुन महाराष्ट्रात सुरु झालेलं आंदोलन आता कर्नाटकापर्यंत पोहोचलं. भोंग्यावरुन वादावादी आणि गरमागरमी सुरु असताना सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. या व्हायरल फोटोत मशिदीवर भगवा झेंडा लावल्याचं दिसून येत आहे. तसेच हा फोटो कर्नाटकातील असल्याचा दावा केला जात आहे. आता हा ध्वज उतरवण्यात आला असून पोलीस एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशीही माहिती समोर येत आहे. (fact check saffron flag on mosque at karnataka belagavi)
कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील सत्तीगिरे गावातील मशिदीत पहाटे भगवा ध्वज फडकताना दिसला. हे गाव बेळगावच्या मुदलगी तालुक्यात असून, सकाळी नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या लोकांनी हा झेंडा पाहिला. त्यानंतर मशिदीसह परिसरातील लोकांना माहिती दिली.
परिसरातील वाढता तणाव पाहून मुस्लिम आणि हिंदू दोन्ही बाजूच्या लोकांनी प्रकरण आणखी चिघळण्याआधीच हाताळले. यानंतर भगवा ध्वज उतरवण्यात आला. सध्या परिसरात शांतता असून खबरदारी म्हणून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलं आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच मशिदीवर झेंडा लावणाऱ्याचा शोध सुरू आहे. पोलीस मशिदीच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज स्कॅन करत होते, मात्र अद्याप काहीही सापडलं नाही. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
झी 24 तास या फोटोची पुष्टी करत नाही.