नवी दिल्ली : मन की बात द्वारे देशवासीयांशी संवाद साधण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आता पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांना परिक्षेदरम्यान येणारा ताण कसा हाताळावा यासाठी ते ‘एक्झाम वॉरिअर्स’ या पुस्तकातून मार्गदर्शन करणार आहेत.
मोदींच्या या पुस्तकाचे आज प्रकाशन झाले असून हे पुस्तक इंग्रजीव्यतिरिक्त इतर विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. सतत वाढणारी जीवघेणी स्पर्धा, पालकांच्या अपेक्षांचे ओझे यामुळे मुलांवर खूप ताण येतो. तो सहन न झाल्याने किंवा अपयश आल्याने अथवा अपेक्षांची पूर्तता न करू शकल्यामुळे अनेक विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलतात. गेल्या काही वर्षात यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तणाव हाताळणे, त्यावर नियंत्रण मिळवणे आपण शिकायला हवे. याचेच धडे मोदी पुस्तकातून विद्यार्थ्यांना देणार आहेत. हे पुस्तक दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करेल. पेंग्विन या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
#ExamWarriors: Prime Minister @narendramodi's new book, now available in retail book stores as well as online : https://t.co/GV0nAt8ZHJ pic.twitter.com/uKg0NgIoGx
— Exam Warriors (@examwarriors) February 3, 2018
पुस्तकाचे प्रकाशित झालेले मुखपृष्ठ आकर्षक आहेत. त्यात लहान मुलांसोबत मोदीही दिसत आहेत. विद्यार्थी हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने लेखनासाठी तो विषय निवडला, असे मोदींनी सांगितले. जास्तीत जास्त गुण मिळवण्यापेक्षा ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, हा संदेश पुस्तकावाटे विद्यार्थ्यांना मिळेल, अशी आशा पेंग्विन या प्रकाशन संस्थेने व्यक्त केली आहे.