ऑनलाईन दारु मागवणं पडलं महागात, माजी IAS अधिकाऱ्याला लाखोंचा फटका

ऑनलाईन व्यवहार करताना सावध राहण्याची गरज आहे. कारण आता ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

Updated: Aug 7, 2022, 04:12 PM IST
ऑनलाईन दारु मागवणं पडलं महागात, माजी IAS अधिकाऱ्याला लाखोंचा फटका title=

मुंबई : आज सर्वकाही घरबसल्या उपलब्ध होत आहे. मोबाईलवरुन कोणतीही गोष्ट मागवणं सोपं झालं आहे. पण या सोबतच फसवणुकीचे प्रकार ही वाढले आहेत.

सर्वकाही डिजिटल होत असल्याने बँकेपासून ते मार्केटपर्यंतची कामे एका क्लिकवर होत आहेत. लोकांना आता ऑनलाईन शॉपिंगची सवय होत चालली आहे. पण यासोबत ऑनलाइन फसवणूक देखील वाढत आहेत. गुन्हेगार लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. हरियाणातील गुरुग्राममध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे.

गुरुग्राममध्ये राहणाऱ्या एका माजी आयएएस अधिकाऱ्याने ऑनलाइन दारू ऑर्डर केली. पण 630 रुपयाच्या बदल्याच मोठा फटका सहन करावा लागला. ही घटना 23 जुलैची आहे. घरी पार्टी सुरु असताना त्यांनी दारूची होम डिलिव्हरी ऑनलाइन ऑर्डर केली होती. ऑर्डरची किंमत केवळ 630 रुपये होती, परंतु त्याऐवजी निवृत्त आयएएस अधिकाऱ्याच्या क्रेडिट कार्डमधून सुमारे 2 लाख रुपये ट्रान्सफर झाले.

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, संध्याकाळी 6 च्या सुमारास jagdishwineshopgurgaon.com या वेबसाइटवर पाहुण्यांसाठी घरपोच दारूची ऑर्डर दिली. त्यांनी सांगितले की माझ्या मोबाईलवर ऑर्डर दिल्यानंतर मला फोन आला. व्यस्त असल्याने, घाईत, कॉलरवर विश्वास ठेवून, मी माझा क्रेडिट कार्ड नंबर आणि वन-टाइम पासवर्ड (OTP) सांगितला.

ऑनलाइन ऑर्डरमध्ये केलेल्या या घाईने माजी आयएएस अधिकाऱ्याला मोठा फटका बसला. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, मला माझ्या मोबाईलवर एक एसएमएस आला की क्रेडिट कार्डवरून 630 रुपये डेबिट झाल्याची माहिती देणारा OTP आला. जोहराच्या म्हणण्यानुसार, काही वेळाने मी तपासले आणि माझ्या क्रेडिट कार्डवरून 630 रुपयांचा नव्हे तर 1,92,477.50 रुपयांचा व्यवहार झाल्याचे आढळले.

दारूच्या होम डिलिव्हरीशी संबंधित ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधीही वेबसाईटच्या माध्यमातून इतर अनेकांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे. अशा प्रकरणाचा तपास केल्यानंतर 1 ऑगस्ट रोजी गुरुग्राम पोलिसांनी तीन सदस्यांच्या टोळीला अटक केली. या आरोपींनी घरपोच दारू देण्याचे आश्वासन देऊन एक लाखाहून अधिक रुपयांची फसवणूक केली होती.