नवी दिल्ली : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्रालयाने तातडीची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, आयबी प्रमुख, रॉ प्रमुख आणि गृह सचिव उपस्थित होते. आयबीने वारंवार सतर्कतेचा इशारा दिल्यानंतरही हल्ला कसा झाला, यावर बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं आहे.
अमरनाथ यात्रेकरूंवर पुन्हा दहशतवादाचे सावट येऊ नये, यासाठी कोणते उपाय करावे यावरही चर्चा झाली. या बैठकीनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली.
अमरनाथ यात्रेवर काल झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर ए तोएबाचा दहशतवादी इस्माईल असल्याचं आयबीच्या सूत्रांच म्हणणं आहे. इस्माईल हा पाकिस्तानी दहशतवादी आहे, काही दिवसांपासुन लष्कर ए तोएबाच्या स्लीपर सेलमध्ये होता. त्यानचं या हल्लाचा कट रचून अंमलात आणला, अशी माहिती पुढे येतेय. काल इस्माईलसह एकूण पाच दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यापैकी दोघे लष्करचे पाकिस्तानमधले तर दोघे स्थानिक तरुण होते. या सर्वांनी गोळीबार करून सात भाविकांचे प्राण घेतले.