फोनवर बोलत असताना वीज कोसळली अन्... शेतकऱ्याची अवस्था पाहून गावकऱ्यांना बसला धक्का

देशभरात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट देखील होत आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण पीक उद्धवस्त झालं आहे. अशातच वीज कोसळून अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे

आकाश नेटके | Updated: Apr 30, 2023, 02:04 PM IST
फोनवर बोलत असताना वीज कोसळली अन्... शेतकऱ्याची अवस्था पाहून गावकऱ्यांना बसला धक्का  title=
(फोटो सौजन्य - PTI)

Accident News : उत्तर प्रदेशात (UP) वीज (lightning) कोसळून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे मोबाईल फोनवर बोलत असताना वीज पडून 50 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतात ऊस तोडत असतानाच हा अपघात झाला. या अपघातानंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शेतजमिनीत हा शेतकरी फोनवर बोलत असतानाच त्याच्यावर वीज पडली आणि त्यानंतर तो खाली कोसळला. अपघातानंतर त्याच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह घरी आणला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत शेतकऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. राजागंजजवळील फरधान पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या खजुहा या गावात हा सर्व प्रकार घडला. श्रीपाल उर्फ ​​पालू हा आपल्या उसाच्या शेतात फोनवर बोलत होता. त्याचवेळी त्याच्या अंगावर वीज कोसळली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. 200 मीटर दूर असलेल्या घरापर्यंत जेव्हा श्रीपालच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेचा मोठा आवाज झाला तेव्हा सुरुवातीला त्यांना काहीच समजले नाही. श्रीपालला गावकऱ्यांनी जमिनीवर पडलेले पाहिले तेव्हा त्याचे डोके, मांडी आणि छाती फाटलेले दिसले. यावरुन त्याच्यावर वीज कोसळ्याचे समजत होते घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. 

श्रीपालच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती ठीक नव्हती. त्याचे घर शेतातल्या मजुरीवर चालत होते. श्रीपालच्या कुटुंबाकडे अडीच एकर जमीन होती. त्याला 4 मुली आणि 3 मुलांसह 7 अपत्ये आहेत. चारही मुली आणि दोन मुलांचे लग्न झाले असून एका मुलाच्या लग्नाची तयारी सुरु होती. मात्र त्याआधीच श्रीपालवर वीज कोसळली आणि त्याचा मृत्यू झाला.

गव्हाचे पीक गोळा करताना कोसळली वीज

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील सिरसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. वीज कोसळल्याने शेतकरी विजय दोहरा (45) यांचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी तिघे शेतकरी शेतात कापणी केलेले गव्हाचे पीक गोळा करत होते. यावेळी अचानक वीज पडल्याने दोहरा यांचा जागीच मृत्यू झाला तर सुरेंद्र सिंह आणि देवेंद्र सिंह हे भाजले गेले.

राजापूर येथे वीज पडून एक जण ठार

दरम्यान, महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातही सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस कोसळत आहे. विजांच्या कडकडाटसह वादळी वाऱ्यासह पावसामुळे येवला तालुक्यातील राजापूर गावात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राजापूर गावातील सोनताळा वाघ वस्तीतील सोमनाथ भीमा वाघ यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमनाथ वाघ यांच्या मृत्यूमुळे येवला तालुक्यासह गाव परिसरात शोककळा पसरली आहे.