NCP: आताच्या क्षणाची मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

Election Commission Withdraws National Party Status of NCP: केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; आता राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक दर्जाचा पक्षा असा दर्जा दिला जाणार.

Updated: Apr 10, 2023, 08:34 PM IST
NCP: आताच्या क्षणाची मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द title=
Election Commission Withdraws National Party Tag of NCP

NCP National Party Status: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) देण्यात आलेला राष्ट्रीय पक्षाच्या दर्जा काढून घेतला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता राष्ट्रीय पक्ष (National Party Status) म्हणून आवश्यक असलेला पूर्तता पूर्ण करत नसून त्यामुळे पक्षाचा राष्ट्रीय पक्ष हा दर्जा कढून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक किंवा राज्य स्तरावरील पक्ष असा दर्जा दिला जाईल. पक्षाची पुढील भूमिका काय असेल हे ठरवलं जाईल असं पक्षाचे खासदार सुनील तटकरेंनी 'झी 24 तास'शी बोलताना सांगितलं. राष्ट्रवादीबरोबरच सीपीआय आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षालाही निवडणूक आयोगाने धक्का देत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

राष्ट्रीय पक्ष दर्जा मिळवण्यासाठीचा निकष काय?

देशातील कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष हा दर्जा देण्यासंदर्भातील काही नियम आणि निकष आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाचा निकष हा या संबंधित पक्षाचे किती लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. पक्षाच्या उमेदवारांना 4 किंवा त्याहून अधिक राज्यांमधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण मतदानाच्या 6 टक्के मतं मिळणं आवश्यक असतं. तसेच लोकसभेमधील 2 टक्के जागा पक्षाकडे असतील तरच त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. त्याचप्रमाणेच लोकसभेमध्ये ज्या पक्षाचे 3 राज्यांमधून किमान 11 खासदार असतील तरच पक्षाला राष्ट्रीय पक्ष दर्जा दिला जातो.

राष्ट्रीय पक्षांना अनेक फायदे

राष्ट्रीय पक्ष हा दर्जा असलेल्या राजकीय पक्षांना अनेक फायदे मिळतात. राष्ट्रीय पक्षांना देशातील सर्व राज्यांमध्ये एकाच निवडणूक चिन्हावर लढता येतं. राष्ट्रीय पक्ष असलेल्या राजकीय पक्षांना नवी दिल्लीत पक्ष कार्यालयासाठी जागा मिळते.

सर्वात आधी 2019 ला झाली मागणी

2019 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पक्ष दर्जाचा फेरविचार व्हावा अशी मागणी करण्यात आली. याचवेळी सीपीआय आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला देण्यात आलेला राष्ट्रीय पक्षांच्या दर्जाबद्दलही पुन:विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली होत. मात्र त्यानंतर दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता या तिन्ही पक्षांचा राष्ट्रीय पक्ष हा दर्जा काढून घेण्यात आला आहे.