नवी दिल्ली : मध्य प्रदेशमध्ये २३० जागांची मतमोजणी पार पडण्यासाठी २४ तासांहून अधिक कालावधी लागला. मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या या मतमोजणीचा निकाल येण्यासाठी बुधवारी जवळपास सकाळी १० वाजले होते. याचं कारण म्हणजे निवडणूक आयोगानं शेवटच्या वेळी मतमोजणीच्या नियमांत केलेले बदल... रविवारी सायंकाळी निवडणूक आयोगानं हे बदल जाहीर केले होते. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर रिटर्निंग ऑफिसर जेव्हापर्यंत त्या फेरीचं लिखित स्वरुपात प्रमाणपत्र देत नाही तेव्हापर्यंत पुढच्या फेरीची मतमोजणी सुरू होणार नाही. रिटर्निंग ऑफिसर्सनं या नियमाचं पालन केलं... त्यामुळे मतमोजणीला उशीर झाला. निकाल लवकर लागावा हे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचं लक्ष्य नव्हतं तर निकाल योग्य लागावा, यासाठी ते मेहनत घेत होते.
मध्यप्रदेशात विधानसभेच्या सर्वात जास्त म्हणजे २३० जागांसाठी मतदान झालं होतं. यासोबतच निवडणूक आयोगानं मतगणनेच्या वेळी वेबकास्टींग होणार नाही तसंच मतगणनेच्या वेळी हॉलमध्ये वाय-फाय नेटवर्कचाही वापर होणार नाही... केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून या मतगणनेवर नजर ठेवली जाईल, असेही आदेश दिले होते.
मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये अनेक जागा अशा होत्या जिथं पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरच्या उमेदवारांमध्ये मतांचं अंतर फारच कमी होतं... अशा वेळी दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारानं निकालांना आव्हान दिल्यानं ही मतमोजणी पुन्हा करावी लागली... त्यामुळे निकाल जाहीर होण्यास जवळपास एका तासाहून अधिक वेळ लागला.
ईव्हीएम मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर त्याची VVPAT मतमोजणीसोबत पडताळणी केली गेली.
१२०० पेपर स्लीपची टॅलीही निकाल उशिरा येण्यासाठी कारणीभूत ठरली. निवडणूक अधिकारी आयोगाच्या निर्देशांचं पालन करत होते.
यंदा पाच राज्यांच्या विधानसभा निडवणुकीत पोस्टच्या मतांची संख्याही अधिक होती... त्यांच्या मतमोजणीसाठीही वेळ लागला.