नवी दिल्ली: देशाच्या आगामी राजकीय व आर्थिक वाटचालीच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात घोषणा होऊ शकते. सध्याच्या लोकसभेची मुदत ३ जून रोजी संपुष्टात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक किती टप्प्यात आणि कोणत्या महिन्यात होणार, यावर निवडणूक आयोगाची चर्चा सुरु आहे. त्यादृष्टीने सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे. सुरक्षा दल आणि अन्य सुविधांच्या उपलब्धतेनुसार निवडणुकीचे टप्पे ठरवले जातील. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्कीम आणि अरूणचाल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुका आटोपण्याचा निवडणूक आयोगाचा मानस आहे. मात्र, नुकत्याच विसर्जित झालेल्या जम्मू-काश्मीर विधानसभेबद्दल अजून निर्णय होऊ शकलेला नाही. नोव्हेंबर २०१८ मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभा विसर्जित करण्यात आली होती. यानंतर सहा महिन्यांच्या आतमध्ये याठिकाणी निवडणूक घेणे बंधनकारक आहे. सहा वर्षांचा अपवादात्मक कार्यकाळ असलेली जम्मू-काश्मीर १६ मार्च २०२१ रोजी विसर्जित होणार होती.
Sources: Election Commission of India to announce the 2019 Lok Sabha election schedule in the first week of March, election would be held in 6 to 7 phases
— ANI (@ANI) January 18, 2019
दरम्यान, सिक्कीम विधानसभेचा कार्यकाळ २७ मे २०१९ तर आंध्र प्रदेश, ओदिशा, अरूणाचल प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ अनुक्रमे १८ जून, ११ जून आणि १ जून रोजी संपुष्टात येत आहे. २०१४ साली लोकसभा निवडणूक ७ एप्रिल ते १२ मे या काळात पार पडली होती. १६ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. यामध्ये देशभरातील एकूण ५४३ मतदारसंघांपैकी २८२ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. उत्तर प्रदेशात भाजपने सर्वाधिक ७१ जागा जिंकल्या होत्या.