'धुम्रपान न करणारे Losers...', तरुणीची पोस्ट पाहून डॉक्टरने फटकारलं, 'माझी सर्वात तरुण रुग्ण...'

धुम्रपान न करणाऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या तरुणीला एका डॉक्टरने सुनावलं असून, सत्यस्थिती सांगत डोळे उघडले आहेत. आपण ट्रिपल बायपास सर्जरी करण्यास सांगितलेला सर्वात तरुण रुग्ण 23 वर्षांचा आहे अशी माहिती डॉक्टरने दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: May 8, 2024, 03:21 PM IST
'धुम्रपान न करणारे Losers...', तरुणीची पोस्ट पाहून डॉक्टरने फटकारलं, 'माझी सर्वात तरुण रुग्ण...' title=

धुम्रपान करणं ही आजकाल काहींसाठी फॅशन झाली आहे. मित्र किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या घोळक्यात एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात सिगारेट घेऊन आपण फारच कूल दिसतो असं या तरुणांना वाटतं. अनेक तरुण-तरुणी तर याच कारणामुळे धुम्रपान करण्यास सुरुवात करतात. पण नंतर याच तरुणाईला जे धुम्रपान करत नाहीत ते फार आऊटडेटेड आहेत असं वाटतं. अशाच एका तरुणीने एक्सवर पोस्ट करत धुम्रपान न करणाऱ्यांना लूजर्स म्हटलं आहे. पण यानंतर एका डॉक्टरने तिला सत्यस्थिती सांगत डोळे उघडले आहेत. 

बंगळुरुमध्ये एका डॉक्टरने सोशल मीडियावर तरुणीला खडेबोल सुनावले आहेत. तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धुम्रपान न कऱणाऱ्यांनी लूजर म्हटलं होतं. यानंतर एका डॉक्टरने तिला धुम्रपानामुळे होणारं नुकसान समाजूवन सांगितलं. डॉक्टर दीपक कृष्णमूर्ती यांनी तरुणीला उत्तर देताना आपल्या एका रुग्णाबद्दल सांगितलं ज्याची वयाच्या 23 व्या वर्षी ट्रिपल बायपास सर्जरी करण्यात आली. 

एक्स युजरने आपल्या पोस्टमध्ये हातात चहाचा ग्लास आणि धुम्रपान करतानाचा फोटो शेअर केला होता. या पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं की, "हे स्मोकर्स अँड लूजर्स (धुम्रपान न करणारे), तुम्ही सर्वजण काय करत आहात?".

एका डॉक्टरने तरुणीच्या पोस्टवर उत्तर देत म्हटलं की, "मी ट्रिपल बायपास सर्जरीसाठी पाठवलेली सर्वात तरुण रुग्ण 23 वर्षाची तरुणी होती, जी धुम्रपान करायची. लूजर व्हा (या तरुणीच्या म्हणण्यानुसार) आणि निरोगी आयुष्य जगा".

या पोस्टला आतापर्यंत 8 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टला 17 हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केलं आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत आपलं मत मांडलं आहे. एका युजरने लिहिलं आहे की, "धुम्रपान सोडल्यानंतर त्याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो का? यामुळे होणारं नुकसान कमी करता येऊ शकतं का? डायबेटिजच्या रुग्णांसाठी दिवसातून 1 सिगारेट किती धोकादायक आहे? मी 40 वर्षांपासून धुम्रपान करत आहे". सोशल मीडियावर अनेकजण डॉक्टरांचं समर्थन करत आहेत.