मध्य प्रदेशात एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये आपण असं कधीच पाहिलं नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. झालं असं की, शिवपुरी जिल्ह्यात राहणाऱ्या 3 वर्षाच्या चिमुरड्याच्या डोळ्यात रात्रीच्या वेळी एक जिवंत किडा घुसला होता. यानंतर हा किडा डोळ्यातील नसांना इजा पोहोचवत होता. यामुळे डोळ्यात फार गंभीर जखम होत होती. कुटुंबाने सरकारी रुग्णालयात मुलाला दाखल केलं. यानंतर डॉक्टरांनी 15 मिनिटांच्या ऑपरेशननंतर किड्याला बाहेर काढलं. पण आश्चर्याची बाब म्हणजे, किडा तोपर्यंत जिवंतच होता. किडा अद्यापही जिवंत असल्याचं पाहून डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला.
बसई गावात ही घटना घडली आहे. येथे राहणारे वीरेंद्र आदिवासी यांचा 3 वर्षीय मुलगा कुलदीपच्या डोळ्यात रात्री एक छोटा किडा घुसला होता. किडा बाहेर येत असल्याने मुलाला प्रचंड वेदना होत होत्या. यामुळे तो सतत रडत होता. रडून रडून त्याचे हाल होत होते. यानंतर त्याच्या आई-वडिलांनी त्याला शिवपुरी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.
रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ डॉक्टर गिरीश चतुर्वैदी यांनी मुलाच्या डोळ्याची तपासणी केली. यानंतर काही वेळाने शस्त्रक्रिया करत हा किडा बाहेर काढण्यात आला. दरम्यान, इतका वेळ डोळ्यात राहिल्यानंतर किडा जिवंत होता. यामुळे डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला.
डॉक्टर गिरीश चतुर्वैदी यांचं म्हणणं आहे की, आतापर्यंतच्या माझ्या करिअरमधील हे पहिलं प्रकरण आहे, ज्यामध्ये रुग्णाच्या डोळ्यात घुसलेला किडा जिवंत राहिला आहे. किडा अश्रूनळीजवळ छिद्र पाडत आतमध्ये घुसला होता. तसंच किडा वारंवार मुलाच्या डोळ्यात छेद करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले होते.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या डोळ्यातून किडा काढण्यासाठी एक छोटं ऑपरेशन करावं लागलं. या ऑपरेशनसाठी 15 मिनिटं लागली. दरम्यान मुलाचा डोळा बरा होईल असंही त्यांनी सांगितलं आहे. ऑपरेशननंतर त्याला औषधं देण्यात आली आहेत. त्याचा फायदा होईल असं डॉक्टर म्हणाले आहेत.