कोरोना वॅक्सीनचं वितरण, कडक पोलीस संरक्षणात निघणार ट्रक

कोरोना वॅक्सीनचं वितरण आज किंवा उद्यापासून सुरु होणार.

Updated: Jan 11, 2021, 10:11 AM IST
कोरोना वॅक्सीनचं वितरण, कडक पोलीस संरक्षणात निघणार ट्रक title=

पुणे : देशातील कोरोना साथीची लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे पाहता कोविशिल्ट लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कडून पुण्यात विविध ठिकाणी पाठविण्याचे काम आज संध्याकाळी (11 जानेवारी) किंवा 12 जानेवारीला सुरू होईल. लसीच्या वाहतुकीच्या योजनेत सहभागी असलेल्या स्त्रोतांनी ही माहिती दिली आहे.

भारतात ज्या दोन लसींना परवानगी देण्यात त्यापैकी एक असलेली कोव्हीशिल्ड लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये तयार झाली आहे. १६ जानेवारी पासून लसीकरणास सुरुवात होणार असल्याने सुरक्षितता पाळली जातेय. पुणे पोलिसांच्या माध्यमातून सिरम इन्स्टिट्यूटच्या बाहेर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. वाहतुक सुरक्षित व्हावी याकरिता 15 पोलीस सध्या तैनात असून काटेकोर पालन केले जात आहे.

लसीने भरलेल्या ट्रक पोलिसांच्या संरक्षणाखाली मांजरी स्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून सुटतील. केंद्र सरकारने शनिवारी घोषणा केली की, भारत 16 जानेवारीपासून कोरोना विषाणूविरूद्ध लसीकरण मोहीम सुरू करेल, ज्यामध्ये पहिल्या तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि अग्रभागी कामगारांना प्राधान्याने लस दिली जाईल.

ही लस पाठविण्याच्या योजनेशी आणि त्याच्या सुरक्षा योजनेशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, 'कोविशिल्ट लस वितरणाचे काम सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. जर काही कारणास्तव आज ते सुरु झाले नाही तर मंगळवारी सकाळी हे काम निश्चितपणे सुरू होईल.'

कोविशिल्ट लस ही ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची भारतीय आवृत्ती असून ती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बनविली आहे. महाराष्ट्र सरकारने विमानतळावर आणि लष्कराच्या ट्रकना सुरक्षेसाठी पोलीस संरक्षण देण्याचे निश्चित केले आहे. कंपनीचे सह-संस्थापक राहुल अग्रवाल म्हणाले की, या कामात जीपीएस सुविधेने सुसज्ज 300 ट्रक तयार आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त 500 ट्रक वापरले जातील.

दुसरीकडे, राष्ट्रीय लसीकरण मोहिमेसाठी सर्व राज्यांनी तयारी दर्शविली आहे. लसीकरणासाठी सर्व तयारी पूर्ण केल्याचा दावा सर्व राज्यांनी केला आहे. बंगाल ते गोवा आणि आंध्र प्रदेश ते उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरात पर्यंत प्राधान्यप्राप्त गटांना लस देण्याची व्यवस्था केली गेली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, त्यांचे सरकार राज्यातील प्रत्येक व्यक्तीला या मोहिमेंतर्गत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा, कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांच्याबरोबर गोवा आणि आंध्र प्रदेशच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनीही लसीकरणाची संपूर्ण तयारी केली असल्याचं म्हटले आहे.