कौतुकास्पद! Zomato Delivery Boy होणार सनदी अधिकारी; होतोय शुभेच्छांचा वर्षाव

Zomato Delivery Boy Clears Public Service Commission Exam: यासंदर्भातील पोस्ट झोमॅटोनेच केली असून त्यांनी सर्वांना या तरुणासाठी किमान एक लाईक तरी करावं असं म्हटलं आहे. या तरुणाने काम करता करता परीक्षेचा अभ्यास केला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 25, 2023, 12:05 PM IST
कौतुकास्पद! Zomato Delivery Boy होणार सनदी अधिकारी; होतोय शुभेच्छांचा वर्षाव title=
या तरुणावर होतोच शुभेच्छांचा वर्षाव (फोटो ट्वीटरवरुन साभार)

Zomato Delivery Boy Clears Public Service Commission Exam: उराशी बाळगलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करावा लागतो. स्वप्न पूर्ण करण्यासाठी फार मेहनत करावी लागते. स्वप्न साकार करायची म्हणजे त्या स्वप्नांचा ध्यास कायम ठेवणं आणि कष्ट घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. असा संघर्ष करुन प्रेरणादायक प्रवास करणाऱ्या अनेक लोकांबद्दल तुम्ही वाचलं किंवा प्रत्यक्ष अनुभवलं असेल. अशा लोकांच्या कथा वाचून खरोखरच प्रेरणा तर मिळतेच पण आपणही आपलं लक्ष्य सोडता कामा नये असं वाटतं. अशीच कथा आहे झोमॅटोमध्ये डिलेव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या विग्नेश नावाच्या तरुणाची. विग्नेश हा आता लवकरच सरकारी अधिकारी होणार आहे.

कोण आहे हा तरुण?

मूळचा तामिळनाडूचा असलेला विग्नेश नुकताच तामिळनाडू लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येनं विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र त्यापैकी अगदीच निवडक विद्यार्थी ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होतात. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना राज्य सरकारकडून अधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळते. आता विग्नेशही सरकारी अधिकारी होणार आहे. ऑनलाइन फूड डिलेव्हरीचं काम करत करत विग्नेशने या परीक्षेची तयारी केली. काम आणि अभ्यासाचं संतुलन संभाळत विग्नेशने हे यश मिळवलं आहे. तामिळनाडू लोकसेवा आयोगाची सिव्हील सेवा परीक्षा तमिळनाडू लोक सेवा आयोगाकडून घेतली जाते. ही राज्य स्तरीय सिव्हील सेवा परीक्षा आहे.

झोमॅटोनं केली खास पोस्ट

यासंदर्भातील माहिती विग्नेश फूड डिलेव्हरी बॉय म्हणून काम करायचा त्या झोमॅटो कंपनीनेच दिली आहे. ट्वीटरवरुन कंपनीने विग्नेशसाठी एक खास पोस्ट केली आहे. "विग्नेशसाठी एक लाईक तर नक्कीच केला पाहिजे. विग्नेश झोमॅटो फूड डिलेव्हरी पार्टनर म्हणून काम करताना तामिळनाडू लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे," असं म्हटलं आहे. 

कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव

झोमॅटोने शेअर केलेल्या या पोस्टला 74 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 180 हून अधिक वेळा रिट्वीट करण्यात आलं आहे. अनेकांनी विग्नेशला परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा देत अभिनंदन केलं आहे. ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे, असं एकाने म्हटलं आहे. मेहनतीचं फळं हे फार गोड असतं, असं अन्य एकाने म्हटलं आहे.