Delhi Temperature: देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या केरळ (Monsoon in kerala) राज्याला मान्सूनची प्रतीक्षा असतानाच भारतातील मध्य आणि उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांची मात्र होरपळ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. तिथं राजस्थानात (Rajasthan) तापमान 50 अंशांपर्यंच पोहोचलेलं असतानाच अचानकच दिल्लीमधूनही उष्णतेच्या लाटेनं सर्व विक्रम मोडल्याचं वृत्त समोर आलं. 29 मे 2024 अर्थात बुधवारी दिल्लीमध्ये तापमानानं सर्व विक्रम मोडित काढले.
हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्लीतील मुंगेशपुर भागामध्ये सर्वाधिक 52.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. दिल्लीमधील हे आतापर्यंत सर्वाधिक तापमान असल्याचं सांगण्यात आलं. ज्यामुळं संपूर्ण देशभरात चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं. चिंतेपेक्षा तापमानवाढीमुळं अनेकांनाच धडकी भरली आणि यंत्रणांनाही धक्काच बसला. इथं संपूर्ण देशभरात तापमानावाढीमुळं मोठ्या समस्येनं डोकं वर काढलेलं असतानाच हवामानशास्त्र विभागाच्या सेंसरमध्ये असणाऱ्या काही त्रुटींमुळं तापमानाच्या वाढीव आकड्याची नोंद करण्यात आली.
दिल्लीतील तापमानाच्या आकड्यामुळं वाढलेली चिंता आणि तांत्रिक बिघाडामुळं निर्माण झालेली ही परिस्थिती पाहता, तापमानानं खरचं 52.9 हा आकडा गाठला का, याविषयीचा प्रश्न उपस्थित झाला आणि त्यानंतर भारतीय हवामानशास्त्र विभागानं पुन्हा एकदा तापमान आकड्यांची चाचपणी केली.
उपलब्ध माहितीनुसार दिल्लीमध्ये मुंगेशपुर, नरेला आणि नजफगढ़मध्ये मंगळवारी 50 अँश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. दिल्लीतील प्राथमिक हवामान केंद्र असणाऱ्या सफदरजंग वेधशाळेनं 46.8 इतक्या कमाल तापमानाची नोंद केली. मागील 79 वर्षांमधील ही सर्वाधिक तापमानवाझ ठरली. दरम्यान दिल्लीच्या तापमानानं देशाचा धडकी भरवल्याचं पाहताना सदर प्रकरणी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी X च्या माध्यमातून एक पोस्ट करत भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आलेली अधिकृत माहिती सर्वांसमोर आणली.
Official Statement issue by India Meteorological Department. @IMDWeather https://t.co/7TbzsiuNp6 pic.twitter.com/wGTFCR0g7f
— Kiren Rijiju (मोदी का परिवार) (@KirenRijiju) May 29, 2024
हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्लीत अद्याप 52.9 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली नसून, प्रत्यक्षात मात्र तापमानाचा आकडा 46.8 ते 48 अंश सेल्सिअसच्या दरम्यानच असल्याचं सांगण्यात आलं. काही ठिकाणी तापमानाच्या आकड्यानं पन्नाशीही गाठली. पण, त्यापलिकडे हा आकडा गेलाच नसल्याचं सांगत 52.9 अंश सेल्सिअस हा आकडा तांत्रिक त्रुटींमुळं दाखवण्यात आल्याची बाब अधोरेखित करण्यात आली.
दरम्यान, दिल्लीमध्ये उष्णतेची तीव्रता वाढत चालली असतानाच उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी भर उन्हात काम करणाऱ्या कामगारांना दुपारी 12 ते 3 या दरम्यानच्या वेळेसाठी भरपगारी सुट्टी देण्याची घोषणा केली. मेहनतीचं काम करणाऱ्या या कामगारांसाठी पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.