नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी यमराज आणि यमदूतला दिल्लीच्या रस्त्यावर आणले आहे. यामाध्यमातून 'यमराज कोरोनाच्या रूपात फिरत आहे' असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा उपक्रम दक्षिण पूर्व जिल्ह्यातील कालका पोलीस स्टेशनच्या नेहरू प्लेस मार्केटमधून सुरू करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत कोरोना संसर्ग दिवसेंदिवस भयानक रूप धारण करतोय. ते पाहता दिल्लीकरांना कोविडच्या धोक्याबद्दल जागरूक करण्यासाठी दिल्ली पोलीस नवीन पद्धती अवलंबताना दिसत आहेत.
दिल्लीतील लोकांना मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, अनावश्यक घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन करण्यात येतं. हे करुनही कोरोना संसर्ग रोखण्यात अपयश येतंय. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी पहिल्यांदाच यमराज आणि यमदूत यांची मदत घेतलीय. यमराज आणि यमदूत हे दोन दिल्लीच्या रस्त्यावर फिरत असून मास्क न घातलेल्यांना कोरोना साथीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहेत. विनाकारण घराबाहेर पडू नका असे सांगताहेत.
स्वत: यमराज आणि यमदूत चेहरा झाकून कोरोना मार्गदर्शक तत्वांचं पालन करताना दिसत आहेत. कोरोना नियमांचे पालन न केल्यास यमराज यांनाही सोबत घेतले जाऊ शकतो असा इशारा देत आहेत. दिल्लीच्या कालकाजी पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी ही मोहीम सुरू केली आहे. यमराज आणि दोन यमदूत नेहरू प्लेस मार्केटमध्ये लोकांना इशारा देताना दिसतायत.
दक्षिण पूर्व जिल्ह्याचे डीसीपी आरपी मीणा यांच्यामते, लोकांना जागरूक करण्यासाठी हा उपक्रम राबविला गेलाय. आम्ही कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या सर्वांशी कडक वागतोय.
गर्दीच्या बाजारपेठेत यमराजाने प्रवेश केल्यावर लोकांमध्ये त्याचा परिणाम दिसतोय. यामुळे लोक घाबरुन सतर्क होतील. लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच लोकांनी कोरोनाची साखळी तोडावी यासाठी पोलिस मास्क देखील वाटत आहेत.