Metro Train : अमुक एका ठिकाणी चोरी झाली, चोरट्यांनी इतक्या किमतीचा ऐवज लांबवला इथपासून ते अगदी येवल्यामध्ये पैठणी चोरीला जाईपर्यंतची वृत्तही आतापर्यंत समोर आली. पण, आता मात्र एक असं प्रकरण समोर येत आहे, जिथं चोरी झालीय खरी पण, जो ऐवज लांबवला आहे तो नेमका आहे तरी काय हे पाहून अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत.
ही चोरी झालीय दिल्लीतील मोतीनगर आणि कीर्तिनगरदरम्यान धावणाऱ्या मेट्रो लाईनवर. गुरुवारी या मार्गावर मेट्रोसेवा अपेक्षित वेळेपेक्षा बरीच उशिरानं सुरू झाली आणि यामागं कारण ठरलं ती म्हणजे इथं झालेली एक चोरी. चोरट्यांनी चक्क मेट्रो मार्गावरील केबल चोरी केल्यामुळं ब्लू लाईनवरील सर्व मेट्रो सेवांचा वेग मंदावला आणि मेट्रो स्थानकांवरच रेंगाळल्याचं सांगितलं गेलं.
X च्या माध्यमातून एक पोस्ट करत डीएमआरसीनं प्रवाशांना यासंदर्भातील माहिती देत घडला प्रकार सांगितला. गुरुवारी मेट्रो सेवेची निर्धारित वेळ पूर्ण झाल्यानंतरच या समस्येवर तोडगा काढला जाईल असंही सांगितलं गेलं. चोरट्यांनी थेट मेट्रोची केबलच पळवल्यामुळं इथं मेट्रो सेवा सुरू तर असेल पण, त्यांचा वेग मात्र तुलनेनं कमी असल्यामुळं प्रवाशांना गैरसोय होणार असल्याचं मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
दिल्ली मेट्रोनं सोशल मीडिया पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार मोती नगर आणि किर्तीनगरदरम्यानची केबल चोरीला गेल्यामुळं ब्लू लाईनवरील मेट्रो सेवा प्रभावित झाली. या असुविधेबद्दल मेट्रो प्रशासनानं दिलगिरीसुद्धा व्यक्त केली.
Blue Line Update
The cable theft issue on the Blue Line between Moti Nagar and Kirti Nagar will be rectified only after the end of operational hours in the night.
Since the trains will operate on restricted speed on the affected section during the day, there would be some…
— Delhi Metro Rail Corporation (@OfficialDMRC) December 5, 2024
दिल्ली मेट्रोमध्ये चोरट्यांनी थेट केबलच लंपास करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा दिल्ली मेट्रोच्याच रेड लाईनवर अशीच घटना घडल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यावेळी झिलमिल आणि मानसरोवर स्टेशन या स्थानकांदरम्यान सिग्नल केबलची चोरी करण्यात आली होती. दिल्लीमध्ये झालेली ही चोरीची प्रकरणं सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. जी दिल्ली मेट्रो देशातील मेट्रो सेवांसाठी आदर्श समजली जाते त्याच दिल्ली मेट्रोची ही तऱ्हा आणि चोरट्यांनी करामत ही या चर्चेमागची मुख्य कारणं असून आता ही चोरट्यांची टोळी नेमकं हे काम कशासाठी करते आणि पुढे या केबलचं होतं तरी काय याचाच शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणा करत आहे.