नवी दिल्ली : पत्नीनं लोकांच्यासमोर आपल्या पतीला थोबाडीत मारणं हे कृत्य आत्महत्येला प्रवृत्त करणं या श्रेणीमध्ये येऊ शकत नाही, असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयानं एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान दिलाय. न्यायालयानं या प्रकरणात आरोपी महिलेला आरोपमुक्त करताना हा आदेश सुनावलाय. सर्वांदेखत पतीला थोबाडीत ठेवून देत महिलेनं त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता.
थोबाडीत मारणं ही घटना जर कुणी आत्महत्येला प्रवृत्त करणं मानत असेल तर त्यानं हे ध्यानात ठेवायला हवं की कोणताही सामान्य विवेक असणारा व्यक्ती अशा स्थितीत आत्महत्या करू शकत नाही, असंही यावेळी न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांनी म्हटलंय.
'केवळ लोकांच्या उपस्थिती पतीला थोबाडीत ठेवून देणं हे कृत्य पतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं होऊ शकत नाही' असंही त्यांनी म्हटलं.
संबंधित दाम्पत्याचा २५ फेब्रुवारी २०१५ रोजी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगीही आहे. दोघांत काही वाद झाल्यानंतर संबंधित महिला पतीचं घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर, २ ऑगस्ट २०१५ रोजी पतीनं आत्महत्येचा प्रयत्न केला... त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु, दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. पतीच्या घरातून एक कथित सुसाईड नोट पोलिसांना सापडली होती. त्याआधारे पोलिसांनी महिलेवर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला होता.