Ban On Firecrackers: दिवाळीला अद्याप दोन महिने शिल्लक आहेत. मात्र दिल्ली सरकारने आतापासूनच राजधानी दिल्लीत फटाके वाजवण्यावर बंदी घातली आहे. प्रदूषणाच्या कारणास्तव दिल्ली सरकार नेहमीच दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालत असतं. पण यावेळी दिवाळीआधीच हा निर्णय घेण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, दिल्ली सरकारने फक्त फटाके वाजवण्यावर नाही तर त्यांची निर्मिती, विक्री आणि साठेबाजी करण्यावरही बंदी घातली आहे. जर एखाद्या व्यक्तीने नियमाचं उल्लंघन केलं तर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
दिल्ली सरकारने हिवाळ्यातील प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी सांगितलं आहे की, दिल्लीत फटाक्यांवर बंदी असणार आहे. तसंच फटाके विकण्याचीही परवानगी नसेल. साठेबाजीही करता येणार नाही. दरम्यान, या प्रकरणी दिल्ली पोलिसांना शहरात निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आल आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे. जो नियमांचं उल्लंघन करेल, त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल.
दिल्ली सरकार गेल्या 3 वर्षांपासून प्रत्येक प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालत आहे. हिवाळ्याच्या आधी दिल्ली सरकार फटाक्यांवरील बंदीचा आदेश जारी करत असतं. दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी सांगितलं आहे की, गेल्या 5 ते 6 वर्षांपासन दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा पाहण्यास मिळाली आहे. पण आम्हाला त्यात अजून सुधार करायचा आहे. यासाठी आम्ही यावर्षीही फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
गतवर्षी, दिल्ली सरकारने जाहीर केलं होतं की शहरात दिवाळीला फटाके वाजवल्यास 6 महिन्यांची शिक्षा आणि 200 रुपयांचा दंड ठोठावला जातो. त्याचसह दिल्लीत फटाक्यांची निर्मिती, साठवणूक आणि विक्रीसाठी स्फोटक कायद्याच्या कलम 9B अंतर्गत 5000 रुपयांपर्यंत दंड आणि 3 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, असंही सांगण्यात आलं होतं.
गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीतील प्रदूषणाची परिस्थिती हिवाळ्यात आणि विशेषत: दिवाळीनंतर गंभीर बनते. दिल्लीच्या शेजारील राज्यांमध्ये सुकं गवत जाळणं हेदेखील यामागील आणखी एक कारण मानलं जातं. हवेच्या खराब गुणवत्तेमुळे दिल्लीकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. याशिवाय निरोगी व्यक्तींनाही डोळ्यांची जळजळ आणि घशाचा त्रास होतो.